धरणगाव तालुक्यातील चोरगाव येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : धरणगाव तालुक्यातील चोरगाव येथे एका कर्जबाजारी शेतकऱ्याने कर्ज फेडण्याच्या विवंचनेत स्वतःच्या शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केली. हि घटना सोमवारी दि. ९ रोजी सकाळी ७ वाजता उघडकीस आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने त्याच्या परिवाराचा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
समाधान चुडामण पवार (वय ४६, रा. चोरगाव ता. धरणगाव) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. गावात तो वृद्ध आई, वडील, पत्नी, २ मुले, विवाहित मुलगी यांच्यासह राहत होते. शेतीकाम करून व मजुरी करीत ते परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. (केसीएन) त्यांच्यावर घरासाठी घेतलेले, शेतीचे व हातउसनवारी असे विविध कर्ज होते. हे पैसे कसे फेडता येईल या विवंचनेत समाधान पवार नेहमी राहत होते.
रविवारी दि. ८ रोजी रात्री समाधान पवार हे घरातून त्याच्या शेतात गेले. त्याठिकाणी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी शेताच्या शेजारी एक मूकबधिर व्यक्ती त्या ठिकाणी आला असता हि घटना उघडकीस आली. (केसीएन) ग्रामस्थांनी समाधान पवार यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल तायडे यांनी तपासून मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.
समाधान पवार यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. चोरगावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. धरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.