चाळीसगाव तालुक्यात घडली होती घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील खडकी फाट्याजवळ भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि. ६ जून रोजी सकाळी १०.३० वाजता घडली होती. याप्रकरणी शनिवारी १५ जून रोजी रात्री ८ वाजता मेहुणबारे पोलीसात कारवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रणजितसिंग बिनससिंग चुंगडे (वय ४५ रा. खापरखेडा ता. कन्नड जि. छत्रपती संभाजी नगर) असे मयत तरूणाचे नाव आहे. रणजितसिग चुंगडे हा तरूण मित्र प्रेमचंद धनसिंग चांदा (वय ५२) यांच्या सोबत दुचाकीने धुळे जाण्यासाठी दि. ६ जून रोजी चाळीसगाव मार्गे निघाले होते. सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास ते चाळीसगाव तालुक्यातील खडकी फाट्याजवळून जात असतांना त्यांच्या दुचाकीला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कार क्रमांक (एमएच १६ सीडी ६६११) ने जोरदार धडक दिली.
या अपघातात रणजितसिंग चुंगडे यांचा जागेवर मृत्यू झाला तर प्रेमचंद चांदा हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान उपचार घेतल्यानंतर नंतर प्रेमचंद चांदा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलीस ठाण्यात कारवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे हे करीत आहे.