चिन्या जगतापच्या मृत्यूप्रकरणी अहवाल डीआयजींना रवाना
जळगाव (प्रतिनिधी) – येथील जिल्हा कारागृहातील चिन्या उर्फ रवींद्र जगताप या कैद्याच्या मृत्यूप्रकरणी कारागृह विभागाने नेमलेल्या चौकशी समितीने चौकशी पूर्ण केली असून हा अहवाल औरंगाबाद येथे कारागृह उपमहानिरीक्षक यांच्याकडे पाठविला आहे. या अहवालात जळगाव कारागृहाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा भोवला असे नमूद केल्याची माहिती मिळाली आहे.
रवींद्र उर्फ चिन्या जगताप हा कैदी कारागृहातून ११ सप्टेंबर रोजी मयतावस्थेत डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. त्याला कारागृहात मारहाण झाली म्हणून त्याचा मृत्यू झाला असा आरोप कुटुंबीयांनी केला होता. त्यामुळे कारागृह विभागाने धुळे येथील कारागृह अधीक्षक डी.के.गावडे यांची चौकशी समिती नेमून सत्यता तपासण्याचा प्रयत्न केला. यानुसार समितीने घटना कशी घडली, कोणी मारहाण केली का याची माहिती घेतली. चिन्याच्या मृतदेहावर सुमारे २२ लहान जखमा आहेत. त्याला मारहाण केली असे चौकशीत कोणी सांगितले नसल्याचे देखील अहवालात असल्याचे दिसून येत आहे. हा अहवाल औरंगाबाद येथे कारागृह उपमहानिरीक्षक यांच्याकडे १५ ऑक्टोबर रोजी पाठविण्यात आला असून आता वरिष्ठ काय कारवाई करतील याकडे रवींद्र जगतापच्या कुटुंबियांसह अनेकांचे लक्ष लागून आहे. दरम्यान मयत रवींद्र जगताप यांच्या पत्नी मिनाबाई जगताप यांचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी शनिवारी १७ रोजी घटस्थापनेच्या दिवशी न्यायालयात बोलावून म्हणणे ऐकून घेतले आहे.