रावेर तालुक्यात कृषी विभागाची भीती
रावेर (प्रतिनिधी) : येत्या खरीप हंगामात रावेर तालुक्यात कापसाच्या लागवड क्षेत्रात सुमारे १ हजार ३७० हेक्टरने घट होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कापसाला गेल्या दोन वर्षांपासून समाधानकारक भाव न मिळाल्याने कापूस उत्पादनाचा खर्चही शेतकऱ्यांचा निघालेला नाही. गेल्या हंगामातील उत्पादन घेतलेला कापसाची मातीमोल भावाने विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती.
गेल्या दोन वर्षांपासून कापसाला योग्य दर मिळत नसल्याची स्थिती होती. कापसाचे भाव वाढण्याच्या आशेने दोन हंगामातील कापूस शेतकऱ्यांनी सांभाळून ठेवला होता. मात्र कापसाच्या दरात कोणतीही वाढ झाली नसल्याने तोट्यात कापसाची शेतकऱ्यांना विक्री करावी लागली होती. शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून असताना शासनाने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले होते. कापसाची शासनाने कमी भावाने खरेदी करणे अपेक्षित असताना याकडे शासनाचे व लोकप्रतिनिधींचे सतत दुर्लक्ष झाले.
त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात रावेर तालुक्यातील कापसाच्या लागवडीखालील क्षेत्रात सुमारे १ हजार ३७० हेक्टर म्हणजेच ३ हजार ५०० एकर क्षेत्र घटणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. ज्वारी व कडधान्याच्या लागवरीचे क्षेत्र यामुळे वाढणार आहे. रावेर तालुक्यातील कापूस लागवडीखालील क्षेत्रात घट येण्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर हळद व मका लागवडीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी ८० ते १०० मिलीमीटर पाऊस पडल्यावरच पेरणी करावी. तसेच रासायनिक खतांचा वापर कमी करावा, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके यांनी दिली आहे.