साडेचार लाख मुद्देमाल जप्त
जळगाव (प्रतिनिधी) : कामायनी एक्सप्रेसमध्ये प्रवाशांवर हल्ला करून बॅग हिसकावणाऱ्या चार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने जळगाव येथे पकडले आहे. या कारवाईत साडेचार लाख रुपयांचा रोख मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सर्व आरोपींना पुढील तपासासाठी लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
मंगळवार दि ९ रोजी बऱ्हाणपूर–जळगाव मार्गावरील कामायनी एक्सप्रेसमध्ये प्रवासी सुधाकर धनलाल पटेल (वय ६०, रा. बऱ्हाणपूर, मध्यप्रदेश) यांच्यावर चार आरोपींनी हल्ला करून त्यांच्या पैशांची बॅग हिसकावली. त्यानंतर आरोपी रावेर स्टेशनवर उतरून पसार झाले होते. तपासाअंती गुरुवार दि. १८ रोजी जी.एस. ग्राऊंड परिसरात संशयित आरोपींच्या हालचाली दिसत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने संशयितांना ताब्यात घेतले. संशयितांजवळील पिशवीत साडेचार लाख रुपये आढळले.
पोलीस चौकशीत संशयित आरोपींनी रेल्वेत दरोडा टाकल्याची कबुली दिली. किरण पंडीत हिवरे (३२, रा. भात्तखेडा, ता. रावेर), अजय सुपडू कोचुरे (२५, रा. खिर्डी, ता. रावेर) , हरिष अनिल रायपुरे (२५, रा. प्रतापपुरा, बऱ्हाणपूर, म.प्र.), गोकुळ श्रावण भालेराव (२७, रा. डांभुर्णी, ता. यावल) असे अटक आरोपींची नावे आहेत. जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी भुसावळ लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असल्याचे पोलीसांनी सांगितले. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सोपान गोरे, प्रितम पाटील, यशवंत टहाफळे, बबन पाटील, सचिन घुगे, प्रदीप सपकाळे, मयुर निकम यांचा सहभाग होता. तांत्रिक मदत गौरव पाटील व मिलींद जाधव यांच्या पथकाने ही कारवाई पार पडली.