महसूल व कृषी विभागाला ग्रामविकास मंत्र्यांच्या सूचना
जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील ज्या महसूल मंडळांमध्ये सलग २१ दिवस २.५ मिलिमीटर पेक्षा कमी पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना तातडीची नुकसानभरपाई म्हणून विमा नुकसान भरपाईच्या २५ टक्के रक्कम आगाऊ देण्यासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यातील मंडळांबाबत महसूल व कृषी विभागाने अधिसूचना तात्काळ प्रसिद्ध करावी, अशा सूचना राज्याचे ग्रामविकास, पंचायतराज व पर्यटनमंत्री गिरीष महाजन यांनी दिल्या आहेत.
जुलै व ऑगस्ट महिन्यात पावसाने खंड दिल्यामुळे खरीप पिकांच्या वाढीवर तसेच संभाव्य उत्पादनावर मोठा परिणाम झाल्याचे चित्र आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत राज्य सरकारच्या सर्वसमावेशक पीक विमा योजनेच्या माध्यमातून प्रतिकूल हवामान परिस्थितीच्या निकषांमध्ये सलग २१ दिवस पावसाचा खंड पडल्यास म्हणजे ज्या महसूल मंडळात २.५ मिलीमीटर पेक्षा कमी पावसाची नोंद झाल्यास या महसूल मंडळांना २५ टक्के अग्रिम नुकसान भरपाई विम्याच्या निकषाप्रमाणे देय आहे. शासन निकषांनुसार जिल्ह्यातील पात्र ठरणाऱ्या मंडळांच्या अधिसूचना प्रसिद्ध करण्याचे काम महसूल व कृषी विभागाने तातडीने करावे. असा सूचना ग्रामविकास मंत्री महाजन यांनी दिल्या आहेत.