मावळते पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या भावना
पोलीस दलातर्फे भावपूर्ण निरोप समारंभ
जळगाव (प्रतिनिधी) :- पोलिस अधिकारी, कर्मचारी यांची समर्पण भावना हेच येथील पोलिस दलाच्या यशाचे गमक आहे. यातूनच जिल्ह्यात एमपीडीए सारख्या कारवाया मोठ्या प्रमाणात होऊ शकल्या व दंगलीसारख्या प्रसंगांना वेळीच नियंत्रणात आणता आले, अशा भावना मावळते पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी व्यक्त केल्या.
पदोन्नतीने बदली झालेले एम. राजकुमार यांना रविवार, ४ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी निरोप देण्यात आला तर नूतन पोलिस अधीक्षक एमसीव्ही महेश्वर रेड्डी यांचा स्वागत समारंभ मंगलम सभागृहात झाला. त्या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर या दोन्ही अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते (जळगाव), कविता नेरकर (चाळीसगाव), एम. राजकुमार यांच्या पत्नी रम्या कन्नन उपस्थित होते.
पोलिस अधीक्षक म्हणून पदभार घेतला असून आता पोलिस दलातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कायदा व सुव्यवस्थेविषयीच्या अपेक्षा पूर्ण करण्यावर आपला भर राहणार असल्याचे एमसीव्ही महेश्वर रेड्डी यांनी नमूद केले. एम. राजकुमार यांचे व माझे काम या पूर्वीच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जवळपास सारखे राहिले असून आताही जळगावातून त्यांच्याकडून पदभार घेतला आहे. त्यांनी येथे जे काम केले त्याची प्रेरणा घेऊन आपणही काम करू व जळगावचे नाव उंचावणार असल्याचे ते म्हणाले.
पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी आपल्या कामाच्या पद्धतीने अनेकांना प्रेरणा दिली असून त्यांच्या मोठ्या मनाचे कौतूकही केले पाहिजे, असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले. फिटनेसविषयीचे किस्से सांगताना जिल्हाधिकाऱ्यांनी अनेक उदाहरणे देत एम. राजकुमार यांचे पोट कधी पुढे दिसणार नाही, मात्र त्यांचे मन मोठे असून सर्वांनी आपले पोट मध्ये घेत व मन मोठे करत काम करावे, असे आवाहन केले.
या वेळी अशोक नखाते, कविता नेरकर यांच्यासह उपविभागीय अधिकारी, अन्य कर्मचाऱ्यांसह शहरातील मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमास माजी महापौर जयश्री महाजन, जि.प.चे माजी सदस्य प्रताप पाटील यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित, पोउनि रेश्मा अवतारे यांनी केले.