जिल्हा परिषदेत पाणीपुरवठा विभागातील घटना ; गुन्हा दाखल
जळगाव ( प्रतिनिधी ) – जलजीवन मिशनच्या कामाचे बिल अदा केले जात नसल्याच्या कारणावरून जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात काम रोखून ठेकेदाराने दरवाजाला कडी लावून अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोंडले. हा प्रकार दि. ५ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेत घडला. या प्रकरणी ठेकेदार नीलेश रमेश पाटील (रा. दादावाडी) याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्यावतीने जिल्ह्यात ठिकठिकाणी जलजीवन मिशनची कामे करण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून या कामांसाठी निधी उपलब्ध होत नसल्याने जिल्ह्यातील ठेकेदारांचे बिलंही रखडले आहेत. त्यात जिल्हा परिषदेला काही प्रमाणात निधी उपलब्ध झाल्याने एकाच ठेकेदाराला बिलाची रक्कम अदा न करता सर्वच ठेकेदारांना थोडी-थोडी रक्कम देण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला. यामध्ये ठेकेदार नीलेश पाटील याचेही बिल थकीत असल्याने तो जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात पोहचले.
प्रलंबित बिल अदा न केल्याच्या कारणावरून त्याने दैनंदिन काम करीत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना ‘तुम्ही कामकाज कसे करता ते पाहतो’ अशी धमकी दिली. तसेच कामाला अटकाव करीत दालनच्या दरवाजाला बाहेरून कडी लावून अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोंडले. या प्रकारनंतर बराच गोंधळ उडून अनेकांनी समजवण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्यापर्यंत पोहचला. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्याचा निर्णय झाला.
या प्रकरणी पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ट सहायक किशोर वसंत निकम (वय ५३) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून ठेकेदार नीलेश पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









