नवी मुंबई (वृत्तसंथा) – बकरीपालनाच्या व्यवसायात पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक करणाऱ्या दोन भामट्यांना कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर या टोळीचा म्होरक्या अद्याप फरार आहे. पोलिसांनी आतापर्यंत आठ लाख रुपये हस्तगत केले आहेत.
कल्याण पश्चिमेकडील हीना कॉम्प्लेक्समध्ये अनमोल गोट अग्रो रीफोर्म याचे कार्यालय होते. कमलाकांत यादव, राजीव गुप्ता आणि पवन दुबे हे तिघे बकरीपालनाचा व्यवसाय करत होते. मुरबाडमध्ये एका ठिकाणी यांनी काही बकऱ्या घेऊन ठेवल्या होत्या. हे तिघेही त्यांच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांना आपल्या व्यवसायात गुंतवणूक करायला सांगायचे.
गोट फार्म दाखवून तुम्ही आमच्या व्यवसायात एक लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला काही दिवसांतच दुप्पट पैसे मिळतील असे सांगायचे. या तिघांनी आतापर्यंत अनेक लोकांकडून जवळपास 40 लाखांहून अधिक पेसे घेतले. परंतु काही दिवसात गुंतवणूकदारांना पैसे मिळाले नाहीत. त्याचवेळी कंपनीचा मालक कमलाकांत यादव पळून गेला. त्यामुळे लोकांनी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रार मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी देविदास ढोले यांनी तपास सुरु केला. पोलिसांनी अखेर लोकांना गंडा घालणाऱ्या राजीव गुप्ता, पवन दुबे यांना अटक केली. तर कमलेश यादव हा त्यांचा म्होरक्या अद्याप फरार आहे. अटक आरोपींकडून पोलिसांनी आतापर्यंत जवळपास आठ लाख रुपये आणि एक लॅपटॉप हस्तगत केला आहे. अशी माहिती देवीदास ढोले यांनी दिली.