चाळीसगाव तालुक्यातील दुर्दैवी घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील आडगाव येथे पुतण्याच्या विवाह सोहळ्यात नाचत असताना काकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे लग्नघरात दुःखाचे वातावरण पसरले आहे.
दिनकर मोहन मिस्तरी (वय ४५, रा. सुरत) असं मयत काकांचे नाव आहे. दिनकर मिस्तरी यांचा चाळीसगाव तालुक्यातील आडगाव येथील पुतण्या भूषण मिस्तरी याचा २७ फेब्रुवारी रोजी म्हणजे विवाह निश्चित झाला होता. या विवाहासाठी दिनकर मिस्तरी व त्यांचा भाऊ सुरेश हे दोघेही आपल्या परिवारासह आठवडाभरापूर्वीच सुरत येथून आडगावात आले होते. २६ रोजी सायंकाळी पुतण्या भूषणला हळद लागली. रात्री अंगणात मोठा मंडप टाकला. रात्री पाहुण्यांचे जेवण वगैरे झाल्यानंतर देव नाचवण्याचा कार्यक्रम सुरु झाला.
या कार्यक्रमात वधु आणि वर अशा दोन्हींकडची मंडळी उपस्थित होती. यावेळी भूषण याचे काका दिनकर हे नाचता नाचता अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. या झटक्यात रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. सोहळ्याला उपस्थित नातेवाईकांसह सर्व गाव सुन्न झालं.दिनकर यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.