जामीन होत नसल्याच्या नैराश्यातून घेतले फिनाईल
जळगाव (प्रतिनिधी) – येथील जिल्हा कारागृहामध्ये गेल्या दीड वर्षांपासून खुनाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या एका कैद्याने रविवारी 4 ऑक्टोंबर रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याचा जामीन होत नसल्याच्या नैराश्यातून त्याने हे पाऊल उचलले असावे असे कारागृहातील रक्षकाच्या फिर्यादीवरून दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कारागृहातील कारभार चव्हाट्यावर आला आहे.मागील महिन्यात चिन्या उर्फ रवींद्र जगताप याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी कारागृह प्रशासनावर प्रश्नचिन्ह उमटले असताना आता एका कैद्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.
जळगाव जिल्हा कारागृहामध्ये सूंतीलाल उर्फ शांताराम बाबूलाल पावरा (वय ३८) हा कैदी 1 एप्रिल 2019 पासून प्रथम न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशान्वये कारागृहात दाखल झाला होता. तेव्हापासून तो कारागृहातच आहे. तो कारागृहातील स्वयंपाक घरामध्ये स्वयंपाक बनवण्याचे काम करतो. फिर्यादी विक्रम हिवरकर हे कारागृह रक्षक आहेत. त्यांनी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादी मध्ये म्हटले आहे की, पाकगृह अमलदार रक्षक म्हणून कर्तव्यावर असताना 4 ऑक्टोंबर रोजी सूंतीलाल उर्फ शांताराम पावरा कैदी कारागृहातील नियमानुसार त्याचा मेव्हणा राजू सखाराम पावरा यांच्याशी फोनवर 9.42 वाजता सुमारे ३ मिनिट 36 सेकंद बोलत होता. त्यांचे संभाषण पावरी भाषेत झाल्यामुळे समजू शकले नाही. मात्र सुमारे 10.30 वाजता त्याला अचानक उलट्या व चक्कर सुरू झाल्यामुळे इतर कैद्यांच्या सहकार्याने रक्षकाने त्याला कारागृहाच्या मेन गेटवर प्राथमिक उपचारासाठी आणले. काय होतेय म्हणून त्याला विचारले, त्यावेळी त्याने स्वयंपाक घरातील साफसफाईसाठी आणलेले फिनाईल पिले असल्याची माहिती दिली.
त्यामुळे त्याला कारागृह रक्षक विक्रम हिवरकर, दत्ता खोत, अमित पाडवी, सीताराम हिवारे यांच्यासह डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. कैदी सुंतीलाल पावरा याने लावलेल्या फोनवरील ऑडिओ रेकॉर्डिंग तपासली असता ती पावरी भाषेत होती. त्यामुळे कारागृहातील दुसऱ्या पावरी बंद्याकडून संभाषण समजून घेतले असता, त्याच्या मेहुणास कैदी सुंतीलाल याने सांगितले कीं, माझ्या घरचा नंबर द्या, त्यावेळी मेहुणाने घरचा नंबर नाही म्हटल्यावर सुंतीलाल पावराने मेहुण्यास सांगितले कि, मी मरून जाऊ का, वकील लावा, माझा लवकर जामीन करा. त्यावर नातेवाईक मेहुणा राजू पावरा याने सांगितले कि, लोकडाऊन असल्याने मालक पैसे देत नाही, त्यामुळे पैसे नसल्याने वकील कुठून लावू , त्यावर कैदी सुंतीलालने, माझ्या बाईचे अंगावरील दागिने विका, वकील लावा व जामीन करा असे सांगितल्याचे समजले. त्यानुसार रक्षक विक्रम हिवरकर यांच्या फिर्यादीनुसार जिल्हापेठ पोलीस स्टेशनला आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून कलम ३०९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेमुळे कारागृहातील कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे. जर कैदी नैराश्यात दिसत असेल आणि त्याने किचनमध्ये फिनाईल पिले तर पाकगृह रक्षक काय करीत होते असा सवाल निर्माण झाला आहे.
खुनाच्या गुन्ह्यामध्ये कारागृहात आहे सुंतीलाल
कैदी सुंतीलाल पावरा हा तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत २६ मार्च २०१९ रोजी पहाटे ४ वाजता सुंतीलाल पावरा याने जळगाव तालुक्यातील वडनगरी गावात सालदारकी करत असताना मालकाच्या डोक्यात पाटा टाकून निर्घृण खून केला व फिर्यादीस कोयत्याने जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नात भाग ५, गु.र. नं. ४८/२०१९, भादंवि कलम ३०२, ३०७ प्रमाणे दाखल गुन्ह्यात २७ मार्च रोजी सांबऱ्या पाडा ता.शिरपूर जि. धुळे येथून अटक झाली आहे. त्यानुसार तो न्यायालयीन कोठडीत १ एप्रिल २०१९ पासून दाखल आहे. तसेच, सुंतीलालच्या नातेवाईकांशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले कि, जामीन मिळावा यासाठी वकील लावा म्हणून सुंतीलाल सारखा मागे लागला होता. मात्र, आता कोरोनामुळे पैसे मिळत नाही म्हणून त्याला सांगितले होते.कारागृह प्रशासनाने रविवारी ४ रोजी दुपारी २ वाजता सुंतीलाल याला दवाख्यान्यात दाखल केल्याची माहिती दिल्याचेही तो म्हणाला. मात्र अद्याप, सुंतीलालचे नातेवाईक हे रुग्णालयात पोहोचले नसल्याची माहिती मिळाली.