
पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील घटना; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पाचोरा ( प्रतिनिधी ) – पाचोरा तालुक्यातील लोहारा येथे जुन्या वादाच्या कारणावरून एका ५८ वर्षीय महिलेवर काठीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी हरिश्वर पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला आपल्या घराच्या ओट्यावर बसलेली असताना शेजारी राहणारा एक व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत त्यांच्या घरासमोर आला. त्याने शिवीगाळ करत घरासमोर पडलेली काठी उचलून महिलेच्या उजव्या हातावर मारहाण केली. या हल्ल्यात महिला जखमी झाली.
घटनेदरम्यान दुसरी महिला देखील तेथे आली. दोघांनीही फिर्यादी महिलेशी वाद घालत शिवीगाळ केली. तसेच फिर्यादी व त्यांच्या मुलाला “आमच्या नादी लागलात तर जीवे मारू,” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी हरिश्वर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ३५२, ३५१(२), ३५१(३) व ३५५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार शांतिलाल पगारे करीत असून, वृत्त लिहिपर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती.








