जळगाव (प्रतिनिधी)- शहरातील शाहूनगरातील मनपा शाळा क्रमांक १२ उर्दू शाळेतून पाण्याची मोटार लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील शाहू नगरात महापालिकेची उर्दू शाळा क्रमांक १२ आहे. शाळेत पाण्यासाठी चार नंबरच्या खोलीमध्ये पाण्याची मोटार बसविण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या आदेशानूसार १३ एप्रिल पासून ही शाळा बंद असल्याने याठिकाणी कोणीही येत नव्हते. दरम्यान शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका तबस्सूबानो शेख अब्दुल रहिम या ३ जून रोजी शाळेत काही कामानिमीत्त आल्या होत्या. यावेळी त्यांना पाण्याची मोटार ठेवलेली खोलीचा दरवाजा उघडा दिसला. यावेळी त्यांनी खोलीत जावून पाहिले असता त्यांना त्या खोलीत पाण्याची मोटार दिसून आली नाही. त्यांनी याबाबत सर्व शिक्षकांसह परिसरातील रहिवाशांना याबाबत विचारण केली मात्र तरी देखील मोटार मिळून आली नाही. त्यांनी शहर पोलीसात धाव घेवून अज्ञात चोरट्याविरुद्ध एक हजार रुपये किंमतीची पाण्याची मोटार चोरीची तक्रार दिली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.