जळगाव ( प्रतिनिधी ) ;-पत्रकार गिरीश कुबेर लिखित पुस्तकात महापराक्रमी छत्रपती संभाजी महाराज तसेच महाराणी सोयराबाई यांच्याबद्दल अत्यंत चुकीची, निराधार व बदनामीकारक माहिती प्रसिद्ध केल्याबद्दल सदर पुस्तकावर कायमची बंदी घालण्यात येऊन लेखक व प्रकाशक यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असे निवेदन आज छत्रपती मराठा साम्राज्य ऑर्गनायझेशनतर्फे जिल्हापेठ पोलीस स्टेशन येथे देण्यात आले.

कुबेर यांचे ‘रेनिसन्स स्टेट : द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ हे इंग्रजी पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. यात छत्रपती संभाजी महाराज, राणी सोयराबाई यांची बदनामी झाल्याने पुस्तकावर तातडीने बंदी घालावी. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनामार्फत करण्यात आली आहे. प्रसंगी जितेंद्र पवार,उदयराम पाटील, दीपक चव्हाण, कैलास पाटील तसेच इतर सदस्य उपस्थित होते.
जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांनी निवेदन स्वीकारत, निवेदनाची चौकशी करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले.







