जळगाव ( प्रतिनिधी ) – सातपुडा परिसरातून होणारी गावठी पिस्तूल तस्करी लपून राहिलेली नाही . मध्यप्रदेशातील उमर्टी येथून मोठ्या प्रमाणात जळगावात शस्त्रे विक्री होत असतात सोमवारी चोपडा येथे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून १२ गावठी कट्टे, मॅगझीनसह ५ जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले गुटखा, गांजानंतर आता गावठी पिस्तूल विक्रीचे जिल्ह्यातील रॅकेट समोर आले आहे.
गेल्याच आठवड्यात दि.१८ रोजी ६ गावठी कट्टे आणि ३० जिवंत काडतूस पोलिसांनी पकडले होते. चोपडा परिसरातच गावठी पिस्तूल विक्री करणारे रॅकेट असून मध्यप्रदेशातून आणि सातपुड्यातून विक्रेते चोपड्यात येतात. वर्षभरात अनेकदा पोलिसांनी गावठी कट्टे विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
सोमवारी सांयकाळी चोपडा बस स्थानक परिसरात संशयित अमीतकुमार धनपत धानिया (वय ३० रा. भागवी ता. चरखी दादरी जि. भिवानी, हरीयाणा) व शनेशकुमार रामचंदर तक्षक (वय 32 रा. भागवी ता.चरखी दादरी जि.भिवानी, हरीयाणा) हे गावठी बनावटीचे पिस्तूल विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी या दोघांकडून २ लाख ६० हजार किमंतीचे १२ गावठी बनावटीचे पिस्टल (कट्टा) मॅग्झीनसह तसेच ५ हजार रुपये किमंतीचे ५ पिवळया धातूचे जिवंत काडतूस हस्तगत केले
चोपडा शहर पोलीस ठाण्यात आरोपींवर पोहेका किरण गाडीलोहार यांच्या फिर्यादीवरून हत्यार कायदा कलम ३/२५, ७/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण, सहा.पोलीस निरिक्षक अजित साळवे व संतोष चव्हाण यांनी भेट दिली. ही कारवाई पोलीस उपनिरिक्षक घनश्याम तांबे, पो ना संतोष पारधी, संदिप भोई, किरण गाडीलोहार, पोकाँ. प्रमोद पवार, प्रकाश मथूरे आदिंच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक घनश्याम तांबे हे करीत आहेत.