जामनेर येथे आयोजन
जामनेर (प्रतिनिधी) :- येथील जिनियस मास्टर्स फाउंडेशनतर्फे रविवारी दि. ६ ऑक्टोबर रोजी शहरात एकलव्य विद्यालयाच्या मैदानावर आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळेला राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन उपस्थित राहणार आहे.
गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा जिनियस मास्टर्स फाउंडेशन ,जामनेरतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात येत आहे. मार्गदर्शक समाजसेवक अमर पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम घेण्यात येत आहे. प्रत्येक तालुक्यातून एक आदर्श शिक्षक असे जामनेर वगळता १४ तालुक्यातील १४ आदर्श शिक्षक व जामनेर तालुक्यातील मराठी व उर्दू असे एकूण १९ केंद्रातील आदर्श शिक्षकांना तसेच जामनेर तालुक्यातील एक केंद्रप्रमुख व एक शिक्षण विस्तार अधिकारी, एक ग्रेडेड मुख्याध्यापक, महसूल कर्मचारी,आरोग्य कर्मचारी, खाजगी प्राथमिक ३ शिक्षक अशी एकूण ४१ पुरस्कार हे दि. ५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून दिले जाणार आहेत. यासाठी आदर्श शिक्षक निवड समिती गठीत करण्यात आली आहे. जामनेर येथील शिक्षण विस्तार अधिकारी विजय सरोदे, उमेश देशमुख, श्रीकांत पाटील, जनार्दन लोखंडे, किरण पाटील, नामदेव पाटोळे हे सहा जण या समितीत असतील व आदर्श शिक्षकांची निवड करतील. पुरस्काराचे स्वरूप शाल, ट्रॉफी व प्रमाणपत्र असे असेल.