धरणगावात तिघांवर गुन्हे दाखल
धरणगाव (प्रतिनिधी) :- शहरातील एका जिनिंग व्यावसायिकाची तब्बल ८६ लाख ९६ हजार ७७८ रुपयात फसवणूक केल्याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनला तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धरणगाव येथील वल्लभ जिनिंगचे मालक हरीश सुभाष अग्रवाल (वय ४७) यांनी फिर्याद दिली आहे. दि. २४ ऑगस्ट २०२२ ते २० मार्च २०२४ च्या दरम्यान ब्रोकर भावेश शहा (रा.कोईम्बतूर, तामिळनाडू), रंजीता इंटरप्रायझेस रायचूरचे मालक भाव्या नायक आणि पायोनियर इंटरप्रायझेस रायचूरचे मालक बबीता संचेती यांनी सर्वांनी संगनमताने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर दि. २६ ऑगस्ट २०२२ रोजी पाठवलेले ११० रूई गठाण व दि. ११ सप्टेंबर २०२२ रोजी पाठवलेले १०० रूई गठाण असा माल घेवुन एकुण ८६ लाख ९६ हजार ७७८ रुपयांची फसवणूक केली.
वारंवार पैशांची मागणी करून देखील पैसे न मिळाल्याने अग्रवाल यांनी धरणगाव पोलिसात अखेर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक पवन देसले करीत आहेत. दरम्यान, तक्रारदार यांनी माल पाठवले बाबतची बिले, तसेच तक्रारदाराने ज्या वाहनात माल पाठवला त्याचे फोटो, माल पाठवल्याचे इ-मेलची प्रत, वाहनात माल भरून पाठवल्याचे वजन काटा पावत्या, इतर कागदपत्र पोलिसांना सादर केली आहेत.
०००००००