पाचोरा तालुक्यात आंबेवडगाव येथील घटना
पाचोरा (प्रतिनिधी): पाचोरा तालुक्यातील आंबेवडगाव येथील पी. सी. के. जिनिंग मिलला लागलेल्या भीषण आगीत ६०० कापसाच्या गाठी जळून खाक झाल्या आहेत. या आगीत सुमारे १ कोटी ५४ लाख रुपयांचे अवाढव्य नुकसान झाले असून, परिसरात खळबळ उडाली आहे.


आंबेवडगाव शिवारात असलेल्या पी. सी. के. जिनिंग मिलमध्ये दि. ८ जानेवारी २०२६ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे मिलमध्ये साठवून ठेवलेल्या कापसाच्या गाठींनी पेट घेतला. या दुर्घटनेत ६०० नग कापसाच्या गाठींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्या अर्धवट जळालेल्या अवस्थेत आहेत. जिनिंग मिलचे व्यवस्थापक (मॅनेजर) प्रमोद हनुमान पाटील (वय ५२, रा. गोरडखेडा) यांनी याप्रकरणी माहिती दिली. आगीची तीव्रता इतकी होती की, पाहता पाहता कोट्यवधींचा माल आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. प्राथमिक अंदाजानुसार १ कोटी ५४ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहुल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. व्यवस्थापक प्रमोद पाटील यांच्या फिर्यादीवरून १३ जानेवारी रोजी पोलीस ठाण्यात ‘अकस्मात आग’ म्हणून नोंद करण्यात आली आहे. सध्या ही आग नेमकी कशामुळे लागली (शॉर्ट सर्किट किंवा अन्य कारण) याचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार हे करत आहेत.









