जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव जिल्ह्यातील १६ नगरपरिषदा आणि २ नगरपंचायतींच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय हालचालींना वेग आला असून, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी ३६ अधिकाऱ्यांची निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
या नियुक्त्यांमध्ये प्रामुख्याने तहसीलदार आणि उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असून, प्रत्येक नगरपरिषद आणि नगरपंचायतीनिहाय निवडणूक व्यवस्थापनाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर आचारसंहितेचे काटेकोर पालन, मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडणे तसेच संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी या नियुक्त्या करताना तालुका आणि उपविभागीय स्तरावर जबाबदाऱ्यांचे विकेंद्रीकरण केले असून, स्थानिक पातळीवर अधिक प्रभावी नियंत्रण राखता येईल, अशी रचना करण्यात आली आहे. नशिराबाद नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी जळगाव तहसीलदार शीतल राजपूत आणि नायब तहसीलदार राहुल वाघ-मुख्याधिकारी यांच्यावर निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीची प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, जिल्ह्यात निवडणुकीच्या तयारीला आता वेग आला आहे.









