सर्वेक्षणातून आकडेवारी समोर, घटस्फोटीत, परीतक्त्यांची संख्या मोठी
जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या मुख्य संकल्पनेतून करण्यात आलेल्या एका विशेष सर्वेक्षणातून जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुमारे १ लाख २२ हजार एकल महिलांची नोंद झाली आहे.यात सर्वाधिक महिलांची नोंद जामनेर आणि रावेर तालुक्यात झाली आहे. एकल महिलांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना आधार देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकल महिलांचे सर्वेक्षण घेण्यात आले.

जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी स्तरावर अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांच्या माध्यमातून हे विशेष सर्वेक्षण घेण्यात आले. ग्रामीण भागात एकल महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी हेमंत भदाणे यांच्या मदतीने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे प्रशिक्षण घेऊन सर्वेक्षण कशा प्रकारे करावे या बाबत सूचना केल्यानंतर १० डिसेंबर ते २५ डिसेंबर या कालावधीत जिल्हाभरात हे सर्वेक्षण घेण्यात आले. यामध्ये १ लाख २२ हजार ६३ इतक्या एकल महिलांची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात एकल महिलांचे सर्वेक्षण करण्यासाठी गुगल फॉर्म च्या मदतीने ऑनलाईन सर्वेक्षण घेण्यात आले.यासाठी २६ प्रश्न असलेली एक प्रश्नावली तयार करण्यात आली होती.या प्रश्नावलीच्या माध्यमातून तालुक्याचे नाव,एकल महिला ज्या अंगणवाडी क्षेत्रात राहते त्याचे नाव,एकल महिलेचे नाव,वय,मोबाईल क्रमांक,एकल महिलेचा प्रकार,एकल महिलेचा सध्याचा व्यवसाय,वार्षिक उत्पन्न,एकल महिलेकडे स्वत मालकीचे घर आहे किंवा कसे,एकल महिलेला कोणता व्यवसाय करायला आवडेल,एकल महिलेला असलेले आपत्य, दीर्घकालीन आजार अशा विविध प्रकारची माहिती या सर्वेक्षणाच्या माध्यमातून गोळा करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेने घेतलेल्या या सर्वेक्षणाच्या माध्यमातून काही महत्वाच्या बाबी पुढे आल्या आहेत. जिल्ह्यात एकल विधवा महिलांची संख्या लक्षणीय असून या सर्वेक्षणाच्या माध्यमातून जिल्ह्यात ग्रामीण भागात १ लाख ९ हजार ९८१ इतक्या विधवा महिलांची नोंद झाली आहे.यात १६ ते २९ वयोगटातील १०८८ तर ३० ते ४४ वयोगटातील १४ हजार १४४ , ४५ ते ५९ वयोगटातील ३३ हजार ५९९ व ६० पेक्षा अधिक वयोगटातील ६१ हजार १५० विधवा महिलांची नोंद झाली आहे.घटस्पोटीत एकल महिलांची संख्या ३४१३ इतकी नोंद झाली आहे.तर ४०५९ इतक्या परितकत्या महिलांची नोंद करण्यात आली आहे.१४६५ महिला या निराधार आश्रयित असल्याचे निष्पन्न झाले आहे.१३३६ महिला या पतीपासून वेगळ्या राहत असल्याचेही पुढे आले आहे.
३० वर्षापेक्षा अधिक वयाच्या अविवाहित महिलांची संख्या १६७४ इतकी असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर १३५ इतर महिलांची नोंद या सर्वेक्षणाच्या माध्यमातून झाली आहे.
जिल्ह्यातील एकल महिलांना सन्मानाने जगता यावे,त्या स्वतःच्या पायावर उभ्या रहाव्यात यासाठी हे सर्वेक्षण हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे.या महिलांचे केवळ सर्वेक्षण करणे नव्हे तर उमेद अभियानाच्या माध्यमातून या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा या मागचा मुख्य हेतू आहे.या माध्यमातून आम्ही एकल महिलांच्या कौशल्य विकासावर आणि रोजगारावर विशेष लक्ष केंद्रित करणार आहोत, असे मिनल करनवाल,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी सांगितले आहे.
एकल महिलांची सर्वेक्षणातून नोंद करण्यात आलेली तालुका निहाय माहिती
अमळनेर-९५४९
एरंडोल-६९२१
चाळीसगाव-१११९२
चोपडा-८९९९
जळगाव-८०४०
जामनेर-१५१६२
धरणगाव-४९७५
पाचोरा-७८१५
पारोळा-७८६४
बोदवड-३४१२
भडगाव-६५३६
भुसावळ-४७०३
मुक्ताईनगर-६२९९
यावल-८४००
रावेर-१२१९५









