आजपासून उमेदवारी अर्ज दाखल सुरू, प्रशासन सज्ज
जिल्हाधिकारी घुगे म्हणाले की, जिल्ह्यातील १६ नगरपरिषद आणि २ नगरपंचायतींसाठी निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झाली असून ४ लाख ५० हजार ८९३ पुरुष, ४ लाख ३८ हजार ९३८ महिला व ८३ इतर मतदार असे एकूण ८ लाख ८९ हजार ९१४ मतदार मतदान करणार आहेत. जिल्ह्यातील मतदार याद्यांमध्ये सुमारे ३० हजार दुबार नावे आढळली असून अशा मतदारांकडून फक्त एका ठिकाणी मतदान करण्याचे हमीपत्र घेतले जाणार आहे.
जिल्ह्यात एक सदस्यीय ३४, दोन सदस्यीय २०६ आणि तीन सदस्यीय ६ प्रभागांमध्ये निवडणूक होणार असून, भुसावळ नगरपरिषद ‘अ’ वर्गात, तर अमळनेर, चाळीसगाव, चोपडा, जामनेर, पाचोरा या ‘ब’ वर्गात, तसेच धरणगाव, सावदा, रावेर, एरंडोल, फैजपूर, यावल, नशिराबाद, वरणगाव, पारोळा आणि भडगाव या नगरपरिषद ‘क’ वर्गात मोडतात. याशिवाय शेंदुर्णी व मुक्ताईनगर नगरपंचायतींसाठीही मतदान होणार आहे.
निवडणुकीत मतदारांना काही ठिकाणी एकापेक्षा अधिक मतांचा अधिकार असेल. चोपडा, यावल, वरणगाव, धरणगाव, एरंडोल व फैजपूर या सहा नगरपरिषदांमधील तीन सदस्यीय प्रभागांमध्ये मतदारांना नगरसेवक पदासाठी तीन आणि नगराध्यक्षपदासाठी एक असे चार मत देण्याचा अधिकार असेल.
कायदा-सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी पोलिस विभागाला सर्व आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संवेदनशील भागांमध्ये विशेष बंदोबस्त, गुन्हेगारांवर कारवाई, तसेच मद्य, पैसा आणि अन्य वस्तूंचे वितरण रोखण्यासाठी कडक पावले उचलली जाणार आहेत. फरार व सराईत गुन्हेगारांवर लक्ष ठेवून आवश्यक ती कारवाई करण्याचेही आदेश जिल्हाधिकारी घुगे यांनी दिले आहेत.
मतदान अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना दोन सत्रांमध्ये प्रशिक्षण दिले जाणार असून, प्रशिक्षणात ईव्हीएम हाताळणी, माँक पोल आणि मतमोजणी प्रक्रियेचे प्रात्यक्षिक दाखवले जाईल. याशिवाय ‘एकल खिडकी प्रणाली’ सुरू करून निवडणुकीशी संबंधित परवानग्या जलद आणि पारदर्शकपणे देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत १० ते १७ नोव्हेंबर दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत राहणार असून, अंतिम उमेदवारांची यादी २६ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. मतदान २ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत पार पडेल, तर मतमोजणी आणि निकाल जाहीर ३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणार आहे.
या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांनी प्रचारयुद्धाची तयारी सुरू केली असून, नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारांच्या चर्चांना वेग आला आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीने जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.









