जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
जळगाव (प्रतिनिधी) :- अमळनेर आणि जामनेर येथील दोन गुन्हेगारांवर एमपीडीए कारवाई अंतर्गत स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काढले आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी मंगळवार ३० जानेवारी रोजी दिली.
रमण उर्फ माकू बापू नामदास (रा. स्टेशन रोड, अमळनेर) आणि योगेश उर्फ भुऱ्या वसंत चव्हाण (वय-३२ रा. बजरंगपुरा, जामनेर) असे स्थानबद्ध केलेल्या गुन्हेगारांचे नाव आहेत. अमळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रमण उर्फ माकू बापू नामदास याच्यावर अमळनेर पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या स्वरूपाचे ४ गंभीर गुन्हे दाखल आहेत तसेच त्याच्यावर २ प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आलेले आहे, असे असून देखील त्याच्यात कुठलीही सुधारणा झालेली नाही. त्यामुळे अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी एमपीडीए अंतर्गत धोकादायक व्यक्ती म्हणून याला स्थानबद्ध करावे, असा अहवाल जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात पाठविला.
त्याचप्रमाणे जामनेर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत गुन्हेगार योगेश उर्फ भुऱ्या वसंत चव्हाण याच्यावर जामनेर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे वेगवेगळे ६ गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याच्यावर ४ वेळा प्रतिबंधात्मक कारवाई देखील त्याच्यात कोणत्याही स्वरूपाची सुधारणा झालेली नाही. त्यामुळे जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी स्थानबद्ध करण्याबाबत अहवाल जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या विभागात पाठविला. त्यानुसार आलेले दोन्ही प्रस्ताव स्थानिक गुन्हे शाखेने जिल्हाधिकारी यांच्या कार्यात रवाना केला.
दरम्यान सोमवारी २९ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दोन्ही गुन्हेगारांवर स्थानबध्दतेची कारवाई करण्याच्या आदेशाला मंजूरी दिली आहे. यातील गुन्हेगार रमण उर्फ माकू बापू नामदास याला ताब्यात घेऊन कोल्हापूर येथे स्थानबद्ध करण्यात आले तर जामनेर येथील गुन्हेगार योगेश उर्फ भुऱ्या वसंत चव्हाण याला ताब्यात घेऊन ठाणे जिल्हा कारागृहात रवानगी केली आहे.