जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्ह्यात आतापर्यंत एस टी चे २६३ कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत संपकरी कर्मचाऱ्यांपैकी २० जण कामावर रुजू झाले आहेत त्यात १० वाहक आणि १० चालक आहेत .यांत्रिकी विभागातही काही कर्मचारी कामावर येत आहेत अशी माहिती आज जळगावचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी दिली .

जळगावचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी सांगितले की , जळगाव विभागात एस टी चे ४ हजार ५०० कर्मचारी आहेत . ११० कर्मचाऱ्यांना शनिवारी निलंबित करण्यात आले होते . या संपाचा आजचा १५ वा दिवस आहे . ज्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले त्यांच्या निलंबन आदेशात नमूद करण्यात आले आहे की , बेकायदेशीर संपात सहभागी होणे , इतरांना या संपात सहभागी होण्यास प्रवृत्त करणे , एस टी महामंडळाची प्रतिमा जनमानसात मालिन होण्यास कारणीभूत होणे , मुंबईच्या औद्योगिक न्यायालयाने याचिका क्रमांक २१७ / २०२१ मध्ये दिलेल्या आणि उच्च न्यायालयाने याचिका क्रमांक २१६९९ / २०२१ मध्ये ३ नोव्हेबररोजी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करणे या कारणांमुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे . निलंबित कर्मचाऱ्यांना निलंबन काळात दररोज दुपारी १२ वाजेपर्यंत आगार व्यवस्थापकांच्या कार्यालयात हजेरी लावणे बंधनकारक असून त्यांना निलंबन काळात ५० टक्के वेतन देण्यात येणार आहे .
एसटीचे राज्यशासनात विलीनीकरण करण्यासाठी राज्यभरात सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी राज्य शासनाने पगारवाढीचा प्रस्ताव सादर केला परंतु हा निर्णय मान्य नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी संप कायम ठेवला जळगाव जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी रोष व्यक्त करत कुलदेवतेची घेत संप सुरूच ठेवला आहे.
एसटी बंदमुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत त्यांना खाजगी वाहनातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. काही ठिकाणी बसेसवर दगडफेक होत असल्याने पुन्हा बस माघारी घेतली जाते. प्रवाशांची संख्या पाहत बसेस सोडल्या जात असल्याचे जळगाव विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी सांगितले आहे.







