चौथा मंत्री कोण होणार यावर चर्चा सुरु
जळगाव (विशेष प्रतिनिधी) :- विधानसभा निवडणुकीत निकाल जाहीर झाल्यानंतर आता शपथविधी आणि मंत्रिमंडळ याची चर्चा सुरु झाली आहे. मागील मंत्रिमंडळातील तिघे जण कॅबिनेट मंत्री राहतील हे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र अजून एक राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. चौथा मंत्री कोण होणार यावर चर्चा सुरु झाली आहे.
जिल्ह्यात महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारांचा समावेश आहे. यात जामनेरचे गिरीश महाजन, शिवसेनेचे गुलाबराव पाटील हे वरिष्ठ नेते असल्याने त्यांचे कॅबिनेट मंत्रिपद निश्चित आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अनिल पाटील हेदेखील निष्ठावान असल्याने अजित पवार हे अनिल पाटील यांना पुन्हा संधी देणार असल्याची माहिती आहे.
यासह भुसावळ मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून आलेले तसेच अनुसूचित जातीमधील उमेदवार संजय सावकारे यांना राज्यमंत्री म्हणून प्राधान्य मिळू शकते. दुसरीकडे खान्देशातून सर्वाधिक मताधिक्य मिळविलेले आ. राजूमामा भोळे यांची तिसरी टर्म असल्याने त्यांचेही नाव चर्चेत आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडून पाचोरा येथेही सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले किशोर पाटील यांच्यासह घराण्यात सलग तिसऱ्यांदा आमदारकी मिळालेले चोपड्याचे प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचेही नाव राज्यमंत्री पदासाठी चर्चेत आहे.