जिल्हा परिषदेच्या सीईओ मीनल करणवाल यांची माहिती
जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव जिल्ह्यात क्षयरोगग्रस्त रुग्णांना पोषण आहार तसेच मानसिक व सामाजिक आधार देण्यासाठी “निक्षय मित्र नोंदणी अभियान” राबविण्यात येत आहे. या अभियानाला जिल्ह्यात उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत १३३३ निक्षय मित्रांची नोंदणी पूर्ण झाली आहे.

क्षयरोगमुक्त भारत या उद्दिष्टपूर्तीसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी जिल्ह्यातील शासकीय अधिकारी, कर्मचारी, संस्था, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांना “निक्षय मित्र” म्हणून पुढे येण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत १३१३ नागरिकांनी ऑनलाइन माध्यमातून नोंदणी करून क्षयरोग निर्मूलनाच्या या सामाजिक चळवळीत सहभागी होण्याची सकारात्मक भूमिका घेतली आहे.
निक्षय मित्र या संकल्पनेअंतर्गत प्रत्येक स्वयंसेवक किंवा संस्था क्षयरोगग्रस्त रुग्णाला पोषण आहार, औषधोपचाराच्या काळात मानसिक आधार तसेच आवश्यक मदत पुरविते. या उपक्रमामुळे रुग्णांमध्ये उपचारावरील विश्वास वाढतो आणि क्षयरोग निर्मूलन मोहिमेला बळकटी मिळते.
मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी सांगितले की, “क्षयरोग निर्मूलनासाठी शासनाच्या प्रयत्नांना समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग आवश्यक आहे. निक्षय मित्र म्हणून सहभागी होणे म्हणजे समाजातील सर्वात दुर्बल घटकासाठी हात पुढे करणे होय.”
जिल्हा क्षयरोग विभागामार्फत हे अभियान सातत्याने राबविण्यात येत असून, आगामी काळात जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून आणखी नागरिकांनी निक्षय मित्र म्हणून नोंदणी करून या आरोग्यदायी मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.









