जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात कोरोना साथरोग आटोक्यात येत असून शुक्रवारी जिल्हावासीयांसाठी दिलासादायक बातमी आली आहे. गेल्या २४ तासात फक्त १२१ रुग्ण आढळले असून जळगाव शहरातील एकमेव मृत्यू वगळता जिल्ह्यात कोठेही मृत्यू झालेला नाही. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा कोविड रुग्णालयात शुक्रवारी देखील एकही मृत्यू झाला नसल्याचे दिसून आले.
जिल्ह्यात जळगाव ग्रामीण, पाचोरा, भडगाव या तीन ठिकाणी शुक्रवारी एकही रुग्ण आढळलेला नाही. तर, पारोळा व बोदवड येथे फक्त एकच रुग्ण आढळला आहे. गेल्या ९६ तासात जिल्हा कोविड रुग्णालयात एकही मृत्यू झालेला नाही. तसेच रुग्ण बरे होण्याचा दर देखील वाढला असून ९१ टक्के रुग्ण बरे झाले आहे. त्यामुळे कोरोना जिल्ह्यातून कमी होण्याचे चिन्ह दिसत आहे. तरी देखील नागरिकांनी गाफील न राहता मास्क वापरणे, शाररिक अंतर ठेवणे व वेळोवेळी हात धुवावे असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.