जळगाव, पारोळा, पाचोरा, अमळनेर, चोपडा निवडणूक युतीला जाणार जड
जळगाव (विशेष प्रतिनिधी) :- राज्यामध्ये विधानसभा निवडणूक लागल्यावर व अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी जळगाव जिल्ह्यात रंगतदार लढती दिसून येत आहेत. जिल्ह्यात भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीच महायुतीच्या उमेदवारांविरुद्ध अपक्ष अर्ज दाखल केल्यामुळे आता खरा कस भाजपचे जिल्ह्याचे नेते, संकटमोचक गिरीश महाजन यांचा लागणार आहे. काही मतदारसंघात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बंड करून अपक्ष अर्ज भरल्याने भाजपच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जळगाव जिल्ह्यातील विधानसभेच्या ११ जागांपैकी प्रत्येकी ५ जागा ह्या भाजपा व शिवसेना शिंदे गटाला तर अमळनेरची जागा हि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला मिळाली आहे. यात जळगाव शहर येथून आ. राजूमामा भोळे यांच्यावर टीका करून भाजपाचे माजी नगरसेवक अश्विन सोनवणे यांच्यापाठोपाठ आता माजी नगरसेवक मयूर कापसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.(केपीएन) यात कापसेंनी पक्षाच्या पदांचा राजीनामा दिला. दुसरीकडे पारोळा-एरंडोल मतदारसंघात माजी खा. ए. टी. पाटील यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. याठिकाणी महायुतीचे अमोल चिमणराव पाटील उमेदवार आहेत. मात्र ए. टी. पाटलांमुळे अमोल पाटील अडचणीत येऊ शकतात.
पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात मागील वर्षीप्रमाणे अमोल शिंदे यांनी युतीचे शिवसेनेचे उमेदवार आ. किशोर पाटील यांचेविरोधात अर्ज दाखल केला आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते व जिल्हा नियोजन समिती सदस्य माजी आ. दिलीप वाघ हेदेखील अपक्ष रिंगणात असून जोरदार प्रचार त्यांनी सुरु केला आहे. येथे अमोल शिंदे व दिलीप वाघ यांची नाराजी गिरीश महाजन कशी दूर करतात हे पाहण्यासारखे आहे.(केपीएन)चोपडा मतदारसंघात भाजपमधून बाहेर पडून हाती मशाल घेत माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणे यांनी उमेदवारी देखील मिळविली आहे. त्यामुळे युतीचे उमेदवार शिवसेनेचे चंद्रकांत सोनवणे यांना विजयात धोका निर्माण झाला आहे.
अमळनेरात भाजप समर्थक माजी आ. शिरीष चौधरी यांनीहि युतीचे उमेदवार आ. अनिल पाटील यांच्याविरोधात आव्हान उभे केले आहे. त्यामुळे अमळनेरात रंगतदार लढत पाहायला मिळणार आहे.(केपीएन)अखेर संकटमोचक बंडोबांना कसे थंड करतात हे येत्या माघारीच्या ४ तारखेपर्यंत दिसून येणार आहे. गिरीश महाजन यांना पक्षाने जामनेर विधानसभा मतदारसंघात सातव्यांदा उमेदवारी दिली असून आज शेवटच्या दिवशी त्यांनी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
खरेतर त्यांना विजयाची आशा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील जामनेर दौऱ्यावर सांगितले होते, गिरीश महाजन फक्त अर्ज भरायला येतील. बाकीचे काम तुम्हाला करायचे आहे. मात्र विरोधकांनी भाजपमधूनच आलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे यांच्यासारखा तगडा उमेदवार दिल्यामुळे संकटमोचक गिरीश महाजन यांना नामांकन रॅली काढावी लागली असल्याची प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या नेत्याकडून ऐकायला मिळाली.