कोविड रुग्णालयांत गेल्या ७२ तासात मृत्यू ” शून्य ” ;
जिल्हयाचा रुग्ण बरे होण्याचा दर राज्यामध्ये क्रमांक दोनवर
जळगाव (प्रतिनिधी) – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोरोनाच्या साथीमुळे गेल्या सात महिन्यांपासून कोविड रुग्णालय घोषित झालेले आहे. हे रुग्णालय लवकरच पुर्वीप्रमाणे सामान्य रुग्णालय होण्याचे संकेत दिसत असून गुरुवारी ८ ऑक्टोबर पर्यंत या कोविड रुग्णालयांमध्ये निम्मे म्हणजेच ३५६ पैकी १७८ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालय पूर्ववत सुरु होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्हयाचा रुग्ण बरे होण्याचा दर राज्यामध्ये सर्वाधिक असून सध्या जळगाव क्रमांक दोनवर आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा कोविड रुग्णालयात ३५६ पैकी १७८ रुग्ण उपचार घेत आहेत. याशिवाय सामाजिक संस्थांनी केलेल्या सहकार्यामुळे आणखी १०७ खाटा रुग्ण सेवेत दाखल झालेले आहेत. गेल्या ७२ तासात एकही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याची सुखद बाब असून सोमवारी ५ रोजी एक मृत्यू झाला होता. येथील अधिष्ठाता, डॉक्टर्स, परिचारिका, वार्डबॉय आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या परिश्रमाने गेल्या चार महिन्यात उत्तम अश्या सुविधा असलेले रुग्णालय तयार झालेले आहे. भविष्यात जिल्हा सामान्य रुग्णालय घोषित झाल्यानंतर रुग्णांना खात्रीशीर रुग्ण सेवा मिळणार आहे.
जिल्ह्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ९१ टक्के पोहोचला असून समाधानकारक स्थिती आहे. तसेच मृत्यू दरात जळगावची स्थिती चांगलीच सुधारली असून २.४० इतका मृत्यूदर आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय सध्या देवकर कॉलेज आणि डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात सुरु आहे. मात्र, हि दोघी ठिकाणे शहरापासून लांब पडत असल्याने सामान्य नागरिकांना जाणे-येणे परवडत नाही. तसेच येथील सुविधांवरही अनेकदा प्रश्नचिन्ह उमटले आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या असलेल्या शहरात जळगावमध्ये मध्यवर्ती ठिकाणी असलेले जिल्हा सामान्य रुग्णालय आता लवकरच पूर्ववत सुरु होणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. त्यामुळे जिल्हयातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.