धोरणात्मक मतभेदांच्या समर्थनाचा मुद्दा कळीचा
जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा बँकेची निवडणू बिनविरोध व्हावी म्हणून सुरुवातीपासूनचे सर्वपक्षीय पॅनलचे प्रयत्न आता काँग्रेसच्या भूमिकेमुळे अपयशी ठरताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची धोरणात्मक पातळीवर गोची झाल्याचे जाणकारांचे मत आहे.
भाजपची शेतकरी विरोधी धोरणे आणि शेतकर्यांच्या समस्यांकडे होत असलेले दुर्लक्ष हा मुद्दा पुढे करीत काँग्रेसने सर्वपक्षीय पॅनल मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आता पक्षीय पातळीवर भाजपच्या धोरणांना राष्ट्रवादी व शिवसेनेचाही विरोध असल्यामुळे जी भूमिका काँग्रेसची आहे ती या दोघांची का नसावी ? त्याचवेळी जर जिल्हा बँक निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेने भाजपला सोबत घेतले तर त्याचे समर्थन पक्षीय धोरण म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना कसे करणार असा हा राजकीय चर्चेचा रोख आहे.
जिल्हाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील जिल्हा बँक निवडणुकीसाठी सुरुवातीपासून सर्वपक्षीय पॅनलच्या पुढाकारासाठी प्रयत्न करीत आहेत. वैयक्तिक लाभ काहीही नसताना फक्त बँकेची प्रगती आणि बँक अ किंवा अ प्लस व्हावी म्हणून सत्तेत सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे.अशी पालकमंत्र्यांची भुमिका आहे. सर्व पक्षीय पॅनलच्या प्रक्रियेत जागावाटप जाहीर होईपर्यंत सगळे सुरळीत होते. मात्र ऐन वेळी काँग्रेसने भूमिका बदलली याचे नेमके कारण ते सांगू शकलेले नाहीत. भाजपची धोरणे पटणार नाहीत असे त्यांनी सांगितलेले कारण असले तरी ते कुणालाही पटू शकणार नाही. खरेतर अपेक्षेप्रमाणे जागा वाट्याला आल्या नाहीत म्हणून काँग्रेसने ऐनवेळी भूमिका बदलण्याची चर्चा सुरू आहे. जागावाटपाची चर्चा पूर्णत्वाला येत असताना काँग्रेसने जिल्हाध्यक्ष बदलले आणि बदललेल्या जिल्हाध्यक्षांनी ही नवी भूमिका जाहीर केली. त्यामुळे काँग्रेसला अपेक्षेप्रमाणे जागा न दिल्यानेच त्यांची नाराजी असल्याचे बोलले जात आहे. याआधीच्या पंचवार्षिक संचालक मंडळाची निवड ही सर्वपक्षीय पॅनल करूनच झाली होती. त्या वेळी भाजपच्या नेत्यांचा पुढाकार होता स्थानिक राजकारणातली ही महत्त्वाची घटना आता काँग्रेसला त्रासदायक का वाटत आहे असा आक्षेप काँग्रेसच्या भूमिकेवर घेतला जात आहे.
आजची सर्वपक्षीय बैठक जळगाव अंजिठा शासकीय विश्राम गृहात झाली. काहीही निर्णय न होता संपलेली असली तरी आमदार गिरीश महाजन यांनी सावध भूमिका घेतलेली आहे. आम्ही राष्ट्रवादी आणि शिवसेना सोबत पॅनल करून निवडणूक लढविण्याचा विचार करीत आहोत.असे सांगत त्यांनी खरेतर निर्णय आता राष्ट्रवादी आणि शिवसेना कसे घेतात यावरच अवलंबून असल्याचे दाखवून दिले आहे.