जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि उपाध्यक्षपदी श्यामकांत सोनवणे यांची निवड होणे निश्चित झाले आहे .

आज जिल्हा बँकेच्या सभागृहात नवनिर्वाचित संचालकांची अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठी बैठक होत आहे . गुलाबराव बाबुराव देवकर आणि श्यामकांत बळीराम सोनवणे हे दोघेही निवडणूक लढवून निवडून आले आहेत त्यांची बिनविरोध निवड झालेली नाही . गुलाबराव देवकर हे इतर संस्था मतदारसंघ आणि श्यामकांत सोनवणे हे अनुसूचित जाती – जमाती मतदारसंघातून विजयी झाले आहेत . या निवडीची प्रक्रिया सुरु असून दुपारी २ वाजता अधिकृत घोषणा केली जाणार आहे .
काल महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत सत्तावाटपाचा कालावधी निश्चित करण्यात आला होता मात्र महाविकास आघाडीने नावांची घोषणा केली नव्हती . जिल्ह्याच्या राजकारणाला महत्वाचे वळण देणारी व अनेक कारणांनी गाजलेली जिल्हा बँकेची निवडणूक झाल्यावर अध्यक्ष आणि उपद्ज्यक्ष निवडीची उत्सुकता वाढली होती
आज संचालकांच्या बैठकीत महाविकास आघाडीचे सर्व संचालक उपस्थित राहून अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीवर शिक्कामोर्तब करीत आहेत . आधीची ३ वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस कडे आणि नंतरची २ वर्षे शिवसेनेकडे जिल्हा बँकेचे अध्यक्षपद असेल . उपाध्यक्षपद काँग्रेसकडे २ वर्षे , शिवसेनेकडे २ वर्षे आणि शेवटचे १ वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसकडे असेल , असा निर्णय या स्थानिक नेत्यांच्या कोअर कमिटीने घेतला आहे .
महाविकास आघाडीच्या काल झालेल्या बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील , राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे , काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार , आमदार शिरीष चौधरी , आमदार अनिल भाईदास पाटील , आमदार चिमणराव पाटील , आमदार किशोर पाटील , माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर , माजी आमदार चंद्रकांत सोनवणे ,शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, भडगावचे प्रताप हरी पाटील आदी उपस्थित होते.







