जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदांचे उमेदवार कोण असतील याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून उद्या प्रत्यक्ष संचालकांची बैठक सुरु होण्याच्या आधी जाहीर केला जाणार आहे . आज झालेल्या तिन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांच्या कोअर कमिटीच्या बैठकीत अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदांचे कालावधी निश्चित करण्यात आले .
या निर्णयाची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांनी माध्यमांना दिली . यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवारही उपस्थित होते . या बैठकीतील निर्णयानुसार आधीची ३ वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस कडे आणि नंतरची २ वर्षे शिवसेनेकडे जिल्हा बँकेचे अध्यक्षपद असेल . उपाध्यक्षपद काँग्रेसकडे २ वर्षे , शिवसेनेकडे २ वर्षे आणि शेवटचे १ वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसकडे असेल , असा निर्णय या स्थानिक नेत्यांच्या कोअर कमिटीने घेतला आहे .
राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा उमेदवार निश्चित करण्याचे सर्व अधिकार राज्य नेतृत्वाने एकनाथराव खडसे यांना दिले आहेत . राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे ११ संचालक अध्यक्षपदासाठी इच्छुक असले तरी मी वरिष्ठांशी चर्चा करून उद्या नाव जाहीर करीन असे ते मिश्कीलपणे म्हणाले . शिवसेनेचा उपाध्यक्षपदाचा उमेदवार आम्ही पक्षप्रमुखांशी चर्चा करून उद्या जाहीर करू असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले .
या बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील , राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे , काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार , आमदार शिरीष चौधरी , आमदार अनिल भाईदास पाटील , आमदार चिमणराव पाटील , आमदार किशोर पाटील , माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर , माजी आमदार चंद्रकांत सोनवणे ,शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, भडगावचे प्रताप हरी पाटील आदी या बैठकीत उपस्थित होते.