भुसावळ ( प्रतिनिधी) – जिल्हा बँक निवडणुकीत मुक्ताईनगर सोसायटी मतदारसंघातून नाना पाटील यांचा उमेदवारी अर्ज ते जय माता दी पतसंस्थेच्या कर्जाचे थकबाकीदार असल्याचे दाखवून फेटाळण्यात आला. प्रत्यक्षात त्यांचा या पतपेढीशी संबंध नसतांना त्यांना थकबाकीदार दाखविण्याचा प्रकार हा गंभीर असल्याचे सांगत नाना पाटील यांनी भुसावळच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे.

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक आता वादात सापडण्याची चिन्हे आहेत. संबंधच नसलेल्या जय मातादी नागरी सहकारी पतसंस्थेचा मी थकबाकीदार कसा ? , या मुद्द्यावर नाना पाटलांनी संबंधीताना घेरले आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघातून फक्त नाना पाटील आणि एकनाथराव खडसे या दोघांचेच उमेदवारी अर्ज दाखल झालेले होते. नाना पाटील यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने एकनाथराव खडसे यांची बिनविरोध निवड निश्चित समजली जात होती. आता नाना पाटील यांच्या तक्ररीची पोलिसांनी चौकशी केल्यावर पुढे काय होते, याची उत्सुकता जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात वाढली आहे.
निवडणूक प्रक्रिया वेगात सुरु असल्याने नाना पाटील यांना कोणत्या पद्धतीने थकबाकीदार दाखवण्यात आले, याची सत्यता पडताळणी करण्यासाठी संबंधितांना वेळ नव्हता असे नाना पाटील यांना सांगण्यात आले होते. ते थकबाकीदार असल्याची कागदपत्रे खोटी आहेत, हे खरे असले तरी नाना पाटील यांची फिर्याद पोलिसांनी नोंदवून घेतली नव्हती मात्र आज त्यांचा तक्रार अर्ज दाखल करून घेण्यात आला.
भुसावळच्या जय मातादी नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष विजय चौधरी ( पूर्ण नाव माहिती नाही ) , व्यवस्थापक आणि सचिव यांच्या विरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. या लोकांच्याविरोधात फौजदारी कारवाई करण्याची मागणी नाना पाटील यांनी या तक्रार अर्जात केली आहे. कर्जाची रक्कम २ लाख २ हजार ५०० आणि व्याज मिळून अंदाजे ३ लाख रुपयांची थकबाकी नाना पाटील यांच्याकडे असल्याचे या पतसंस्थेने दाखवले होते असे नाना पाटील यांचे म्हणणे आहे.







