“शावैम” च्या पथकाला यश
जळगाव (प्रतिनिधी) :- जन्मतःच वाकडे पाय घेऊन जन्माला आलेल्या बाळांना भविष्यात सामान्य माणसांसारखे आयुष्य जगता यावे याकरिता नुकत्याच पाच बाळांना अत्याधुनिक “पॉन्सेन्टी” उपचार पद्धती वापरून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार करण्यात आले. यावेळी प्रभारी अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांच्या उपस्थितीत त्यांना रुग्णालयातून निरोप देण्यात आला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जन्मतः वाकडे पाय असलेल्या मुलांमध्ये जनजागृती करून त्यांना सामान्यांसारखे आयुष्य जगता यावे यासाठी “पॉन्सेन्टी” उपचार पद्धती वापरली जाते. यात श्रेणीबद्ध प्लास्टर करून पायांना सरळ केले जाते. त्यानंतर पाय पुन्हा वाकडे होऊ नये म्हणून ‘क्लबफुट’ हे विशेष बूट वापरण्याचा सल्ला दिला जातो. अतिशय दुर्गम भागातील कुटुंबियांनाही याचा लाभ मिळाला आहे. अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वी अनेक बालकांवर असे उपचार यशस्वीपणे झाले आहेत व होत आहे.
यात मधुकर सुरेश बडगुजर (वय २, खेडी कढोली ता. एरंडोल) प्रियांशी बारी (अडीच महिने, पिंप्राळा, जळगाव), कार्तिक पांचाळ (२ महिने, खर्ची ता. एरंडोल), सौरभ तडवी (वय ६ महिने, डोंगरगाव ता. पाचोरा), चैतन्य अल्हाद (वय ३ महिने, पिंपळगाव ता. पाचोरा) यांच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले. याकरिता अस्थिव्यंगोपचार विभागप्रमुख डॉ. राजेंद्र अग्रवाल, डॉ. योगेंद्र नेहेते, डॉ. पंकज घोगरे, डॉ. आदित्य जाधव, डॉ. शहेनशहा समशेरा, डॉ. प्रणव समृतवार, डॉ. सचिन वाहेकर,डॉ. हनुमंत यांना बधिरीकरण शास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुरेखा चव्हाण, डॉ. अमित हिवरकर, डॉ. सुभेदार यांच्यासह इंचार्ज परिचारिका रत्नप्रभा पालीवाल, तुळसा माळी यांनी सहकार्य केले.
विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र अग्रवाल यांनी, जन्मलेल्या बाळांना जन्मतः पाय वाकडे किंवा इतर आजार असेल तर उपचारासाठी लवकर रुग्णालयात यावे व् उपचार करावेत असे आवाहन केले.