जामनेर तालुक्यातील सामरोद येथे उपक्रम
जामनेर (प्रतिनिधी) : प्राथमिक आरोग्य केंद्र, वाकडी अंतर्गत उपकेंद्र सामरोद येथे कीटकजन्य व जलजन्य आजाराबाबत सर्वेक्षण करण्यात आले. जामनेर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली व ग्राम पंचायत सरपंच अनिल महाजन व इतर ग्राम पंचायत सदस्य यांच्या सहकार्यातुन परिसरात सर्वेक्षणाचे काम व स्वच्छता मोहीम सुरू आहे.
नागरिकांमध्ये डेंगू डासाबाबत जनजागृती आरोग्य विभागामार्फत केली जात आहे यावेळी सामरोद येथील वापरण्याच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये डास अळीनाशक टाकून टाक्यांमधील डास अळ्या नष्ट करण्यात आल्या व डासउत्पत्ती स्थान नष्ट करणे, परिसर स्वच्छता ठेवणे, डबकी बुजवणे, कोरडा दिवस पाळणे अशा सूचना देण्यात आल्या.
जि. प. प्राथमीक शाळा येथे उपस्थित मुख्याध्यापक गंगाधर बारी व उर्दु शाळा मुख्याध्यापक अब्दुल शेख इतर शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांना साथरोगाबाबत माहिती मार्गदर्शन व जनजागृती करण्यात आली. यावेळी आरोग्य सहाय्यक विक्रमसिंग राजपूत, समुदाय आरोग्य अधिकारी विजय पाटील, आरोग्यसेवक अनंत गंगातिरे, स्वप्निल महाजन, धीरज पाटील हेमंत पाटील, अनिल सोनवणे आशासेविका रेखा बाविस्कर, अरुणा मेढे यांनी सहकार्य केले.