चाळीसगाव (प्रतिनिधी):- भारतीय जनता पक्षाच्या प्रचारार्थ काल, शनिवार दिनांक १५ नोव्हेंबर रोजी प्रभाग क्रमांक ६ मधील हनुमान मंदिर, नेताजी चौक येथे आमदार मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीत जाहीर सभा उत्साहात संपन्न झाली. आमदार चव्हाण यांनी यावेळी चाळीसगाव शहराच्या विकासाचा आपला ‘ध्यास’ असल्याचे सांगून प्रभागवासीयांनी भाजपच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.

आमदार चव्हाण यांनी आपल्या भाषणात नेताजी चौक परिसराचे महत्त्व अधोरेखित केले. “हा परिसर नेहमीच चांगल्या विचारांचा, चांगल्या माणसांच्या पाठिंब्याचा राहिला आहे,” असे ते म्हणाले. या भागात देशासाठी कार्यरत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) भक्कम जाळे असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

प्रभाग क्रमांक ६ हे चाळीसगावच्या आरोग्य व संस्कृतीची ओळख आहे. आ. मंगेश चव्हाण यांनी नमूद केले की, प्रभाग ६ हा सुवर्णा स्मृती उद्यान आणि अण्णाभाऊ साठे जलतरण तलाव या दोन महत्त्वाच्या रत्नांनी समृद्ध आहे. त्यांनी प्रभागातील मुख्य रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून, उर्वरित कामेही लवकरात लवकर मार्गी लावण्याचा ठाम संकल्प व्यक्त केला.

यावेळी त्यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. शहीद हेमंत जोशी यांच्या नावाने असलेल्या क्रीडांगणाच्या जागेवर तात्पुरत्या स्वरूपात सुरू असलेले आरटीओ कार्यालय लवकरच नवीन ठिकाणी स्थलांतरित होत आहे. यामुळे, क्रीडांगणाची ही मोकळी जागा प्रभागवासीयांच्या स्वप्नानुसार विकसित करण्याचा आपला संकल्प अधिक दृढ झाल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले.
विकासासाठी भाजपला साथ द्या
”चाळीसगाव शहराचा विकास हा माझा ध्यास आहे,” असे सांगून आमदार मंगेश चव्हाण यांनी या विकासाचा प्रवास निरंतर पुढे न्यायचा असेल, तर येत्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षासह सर्व नगरसेवकांना प्रचंड बहुमताने विजयी करा”, असे आवाहन नागरिकांना केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आणि नागरिकांनी दाखवलेले प्रेम, सहभाग आणि सहकार्याबद्दल आमदार चव्हाण यांनी प्रभागवासीयांचे मनापासून वंदन करून आभार मानले.









