जीव, अजीव, पुण्य, पाप, आश्रव, संवर, निर्जरा, बंधन आणि मोक्ष असे नऊ तत्त्व आगममध्ये सांगितली आहेत. जो जीव या नऊ तत्त्वांना जाणतो, त्याला सम्यकत्व प्राप्त होते. सम्यक दर्शन (योग्य विश्वास), सम्यक ज्ञान (योग्य ज्ञान) आणि सम्यक चरित्र (योग्य चारित्र्य/वागणूक) ह्या मोक्षपदी जाण्यासाठीच्या पायऱ्या आहेत. आपण ‘जन’ नव्हे तर ‘जैन’ आहोत. जन्माने नव्हे तर कर्मानेही जैन असावे आणि ही नऊ तत्त्वे जाणून घ्यावीत. सम्यक ज्ञान, सम्यक दर्शन आणि सम्यक चारित्र यांची आराधना करून कर्म क्षय करून मोक्षाकडे वाटचाल करावी याबाबत प.पू. सुमित मुनीजी महाराज साहेब यांनी आजच्या प्रवचनातून सांगितले.
श्रुत धर्म आणि चरित्र धर्म असे दोन धर्म असतात. भगवतीसूत्र मध्ये श्रावकाचे २१ गुण सांगितले आहेत. त्यात चारित्र्याला खूप महत्त्व देण्यात आलेले आहे. जैन कोण असतो? याबाबत त्यांनी सांगितले की, जो जिनेश्वर देवांना मानतो तो जैन होय. जैन म्हणून जन्माला आलो आहोत, नावापुरते जैन न राहता त्यांचे वर्तन चारित्र्य साजेसे असायला हवे. राग, द्वेष असणाऱ्याला ‘जन’ म्हणतात तर राग, द्वेषाच्या मात्रा नसतात ते ‘जैन’ असतात. जैन ही जात नव्हे तर विचारधारा आहे. प्रत्येक जैन व्यक्तीला ९ तत्त्वांची माहिती असायला हवी असे आवाहन केले.
परमपुज्य भूतीप्रज्ञ म.सा. यांनी देखील चारित्र्याबाबत विवेचन केले. माणसात चारित्र्य असेल तर नराचा नाराणय बनू शकतो. ‘धन खोया तो कुछ नही खोया, चारित्र्य खोया तो सबकुछ खोया…!’ त्यामुळे चारित्र्य सुयोग्य करण्याचे लक्ष्य प्रत्येकाने ठेवायला हवे यासाठी अर्जुन माळीचे व तीर्थंकरांचे उदाहरण प.पू. भूतीप्रज्ञ महाराज साहेबांनी उपस्थितांना दिले.