नराधमाला ताब्यात देण्यावरून जमाव संतप्त ; पोलिसांचा लाठीचार्ज
पोलीस निरीक्षक शिंदे यांच्यासह दहा ते बारा पोलीस जखमी
जामनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका गावातील सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करून खून करणाऱ्या नराधमाला अटक झाल्याची वार्ता जामनेर शहरात पसरताच मोठा जमाव जमला. त्यांनी नराधमाला आमच्या ताब्यात द्या म्हणून मागणी करत टायर जाळले. महामार्ग रोखला. तसेच जामनेर पोलीस स्टेशनवर हल्लाबोल करत प्रचंड तोडफोड केली. यात पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह दहा ते बारा पोलीस जखमी झाल्याची घटना घडली आहे. प्रत्युत्तरात पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलीस अधीक्षक आल्यावर रात्री पवणे ११ वाजेच्या सुमारास परिस्थिती नियंत्रणात येऊन तणावपूर्ण शांतता झाली.
जामनेर तालुक्यातील एका सहा वर्षीय बालिकेवर एका नराधमाने अत्याचार करून खून केल्याची धक्कादायक घटना नऊ दिवसापूर्वी घडली होती. या घटनेतील नराधम हा फरार झालेला होता. त्याला गुरुवारी दि. २० जून रोजी पोलिसांनी शिताफीने भुसावळ तालुक्यात तापी नदीच्या जवळ ताब्यात घेत अटक केली आहे. नराधमाला अटक झाल्याची माहिती जामनेर शहरात पसरताच मोठा जमाव एकत्र झाला. त्यांनी महामार्ग रोखून चौकात टायर जाळत घटनेचा निषेध केला. तसेच नराधम आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी केली.
या वेळेला पोलिसांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर संतप्त जमाव जामनेर पोलीस स्टेशनकडे आला. त्यांनी पोलीस स्टेशनवर दगडफेक करीत प्रचंड तोडफोड केली. त्यानंतर पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह पोलिसांवर दगडफेक केली. त्यात शिंदे यांच्यासह दहा ते बारा पोलीस जखमी झाले आहेत. तसेच काही नागरिकही जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती वरिष्ठांकडे गेल्यानंतर दंगा नियंत्रण पथकाला जामनेर शहरांमध्ये रवाना करण्यात आले आहे.
घटनेमुळे जामनेर तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जामनेरमध्ये दंगलसदृश्य स्थिती निर्माण झाल्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला आहे. तसेच हवेत १० ते १२ फायर केल्याची देखील माहिती मिळाली आहे.
दरम्यान पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, डीवायएसपी हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत. परिस्थिती सध्या नियंत्रणात आलेली असून सात ते आठ संशयीतांना ताब्यात घेण्यात आले आहे. घटनेमध्ये निरीक्षक शिंदे यांच्यासह पोलीस कर्मचारी हितेश महाजन, कुंभार, सुनील राठोड, आर. एस.कुमावत, संजय खंडारे, प्रीतम बारकले आदी जखमी झाले आहेत. दंगा निर्माण पथकाची वाहने घटनास्थळी दाखल झालेली आहेत. सध्या तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे.