महाजनांचा जनसंपर्क विरुद्ध खोडपेंची रणनीती निर्णायक ठरणार
जळगाव (विशेष प्रतिनिधी) :- विधानसभा निवडणुकीच्या राजकीय आखाड्यात जामनेर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात यंदा विरोधकांना भाजपातूनच पक्षप्रवेश केलेले दिलीप खोडपे गुरुजी उमेदवार म्हणून मिळाले आहे. मागील वर्षी संजय गरुड यांनी चांगली लढत दिली होती. आता खोडपे गुरुजींचा कस लागणार असून तुल्यबळ गिरीश महाजन यांना पराभूत करण्यासाठी कोणती व्यूहरचना आखतात हे पुढील काळात दिसून येणार आहे.
जामनेर विधानसभा मतदारसंघात गिरीश दत्तात्रय महाजन हे सहावेळा निवडून आलेले आहे. आता सातव्यांदा आमदार बनून वजनदार मंत्रिपद मिळविण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु असून त्यासाठी पक्षाला त्यांनी अनुकूल केले असल्याचे अलीकडील पक्षाच्या सभा व कार्यक्रमातून दिसून आलेले आहे. (केपीएन)विधानसभेच्या आखाडयात यंदा त्यांना लढत देणारा एकही प्रतिस्पर्धी नाही. मात्र भाजपमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष राहिलेले दिलीप खोडपे यांची जामनेर तालुक्यात चांगली ओळख आहे. मात्र जामनेरच्या पूर्वेकडील गावांमध्ये खोडपे गुरुजींचा अधिक जनसंपर्क नाही. त्यामुळे या भागात खोडपे कसा प्रचार करतात, कशा प्रकारे त्यांचे व पक्षाचे व्हिजन मतदारांना समजावून सांगतात हे पाहणे लक्षवेधी ठरणार आहे.