गळफास लावून मारून टाकल्याची पित्याची फिर्याद, पतीसह सासूला अटक
जळगाव (प्रतिनिधी) : जामनेर तालुक्यातील जंगीपूरा येथे एका विवाहितेने गळफास घेऊन जीवन संविल्याची घटना उघडकीस आली आहे.दरम्यान, ‘वाळूचे डंपर घेण्यासाठी माहेरवरुन २० लाख रुपये घेऊन ये’ असे म्हणत भाग्यश्रीचा छळ केला जात होता. शेवटी त्यांनी तिला मारून टाकल्याचा आरोप मयत विवाहितेच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी जामनेर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पती व सासूला अटक केली आहे.
भाग्यश्री राहुल परदेशी (२८) असे मृत विवाहितेचे नाव आहे. भाग्यश्री राजपूत हिचा विवाह जंगीपुरा येथील राहुल गोविंदसिंग राजपूत याच्याशी २०२० मध्ये झाला. लग्नात हुंडा कमी दिल्याने माहेरच्यांकडून २० लाख घेऊन ये, असे सांगत पती तिला मारहाण करीत होता. वारंवार होणाऱ्या त्रासाला भाग्यश्री कंटाळली होती. या त्रासामुळे माहेरच्यांनी ५ लाख रोख दिले होते. तरी पतीसह सासरे गोविंदसिंग छगनसिंग राजपूत, सासू रेखाबाई गोविंदसिंग राजपूत व दीर सुनील गोविंदसिंग राजपूत हे शारीरिक व मानसिक छळ करीत होते, असे नातेवाईकांनी सांगितले.
पतीने दोन लाखात डंपर गहाण ठेवल्याने सोडविण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन येण्यासाठी मारहाण केल्याचे वडील सरदार बाबुलाल परदेशी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पतीसह सासू सासरे व दीर यांना अटक करण्यात आली आहे. भाग्यश्री हा त्रास सहन करत राहिली. मात्र, त्यांची मागणी पूर्ण होत नसल्याने पती राहुल परदेशीसह सासू रेखाबाई राजपूत, सासरे गोविंद राजपूत व दीर सुनील राजपूत यांनी संगनमताने भाग्यश्रीला गळफास देऊन तिला जीवे मारून टाकल्याची फिर्याद विवाहितेचे वडील सरदार बाबुलाल परदेशी यांनी दिली आहे.
घटनास्थळी पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम यांच्यासह पहूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे यांनी भेट दिली. या प्रकरणी सासरच्या चौघांविरुद्ध हुंडाबळीचा गुन्हा नोंदविण्यात आला असून पती राहुल राजपूत व सासू रेखा राजपूत यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार शिंब्रे करीत आहेत.