भडगाव तालुक्यातील घटना
भडगाव ( प्रतिनिधी ) – येथील जामदा डाव्या कालव्यात रविवारी वाहून गेलेल्या पाचोरा तालुक्यातील वेरुळी येथील सचिन रामू सोनवणे (वय २५) याचा मृतदेह सोमवारी सकाळी वलवाडीनजीक कालव्यावर असलेल्या पुलाच्या खाली आढळून आला. सचिनच्या मृत्यूमुळे वेरूळी गावावर शोककळा पसरली आहे.
चैत्र पौर्णिमेनिमित्त सप्तश्रृंगगडावर देवीच्या दर्शनासाठी पायी जाणारा वेरुळी ता. पाचोरा येथील बारा तरुणांसह सचिन रामू सोनवणे (वय २५) हा तरुण खेडगावनजीक जामदा डावा कालव्यात पाय घसरून पडला. पाण्याचा प्रवाहात तो वाहून गेला. त्याच्या सोबत असलेल्या खेडगाव व वेरुळी येथील तरुणांनी त्याचा शोध घेतला, मात्र उपयोग झाला नाही. रविवारी दि.६ रोजी सकाळी साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
गिरणा धरणातून आवर्तन बंद केल्याने जामदा डाव्या कालव्याचे पाणी रात्रीतून कमी झाल्यानंतर मृतदेह आढळून आला. रविवारी खेडगाव येथील पोलीस पाटील कृष्णा हिरे, विजय सोनवणे, पाटबंधारे विभागाचे अभियंता पी.टी. पाटील व नागरिकांची कालव्याच्या काठावर शोधमोहीम सुरू होती. त्या तरुणासोबतचे ११ तरुण देखील घटनास्थळी थांबून होते.