शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अत्याधुनिक जळीत कक्षाचे उद्घाटन
जळगाव (प्रतिनिधी) – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील मॉड्युलर जळीत कक्ष व अतिदक्षता विभागाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कक्षातील अत्याधुनिक उपचार व सोयी सुविधेमुळे जळीत रुग्णांना मोठा आधार मिळणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत मंजूर निधीमधून मॉड्युलर जळीत कक्ष व अतिदक्षता विभागाचे उद्घाटन गुरुवार दि. २६ सप्टेंबर रोजी सकाळी ओपीडी इमारतीमध्ये करण्यात आले. या विभागाचे उद्घाटन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खा. स्मिता वाघ, अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील, उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड प्रामुख्याने उपस्थित होते.
सुरुवातीला कोनशिलाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. नंतर फीत कापत कक्षाचे खा. स्मिता वाघ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. उप अधिष्ठाता तथा शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. मारोती पोटे आणि सहकाऱ्यांनी पालकमंत्री व खा. वाघ यांना जळीत कक्षातील अतिदक्षता कक्ष, जनरल कक्ष, अत्याधुनिक शस्त्रक्रिया गृह तसेच विविध सोयी सुविधा दाखवून त्याबाबत माहिती दिली.
यावेळी कक्षात दाखल झालेल्या रुग्णांची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संवाद साधून त्यांना धीर दिला. तसेच आपण लवकर बरे व्हाल, या रुग्णालयात आपल्याला पूर्ण सुविधा मिळतील असे आश्वासित केले. यावेळी रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. जितेंद्र सुरवाडे व संजय चौधरी, अतिरिक्त वैद्यकीय अधीक्षक डॉ. धर्मेंद्र पाटील, मुख्य अधीसेविका प्रणिता गायकवाड, शल्य चिकित्सा विभागातील डॉ. संगीता गावित, डॉ. प्रशांत देवरे, डॉ. महेंद्र मल, डॉ. समीर चौधरी, डॉ. बाळासाहेब सुरोशे, डॉ. दीपक शेजवळ, डॉ. योगिता बावस्कर यांच्यासह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी शल्यचिकित्सा विभागातील डॉ.सुनील गुट्टे, डॉ. किरण सोंडगे, डॉ. जिया उल हक यांच्यासह विभागातील डॉक्टरांनी तसेच मंगेश बोरसे, सुधीर करोसीया, प्रकाश पाटील, रवींद्र पाटील आदींनी परिश्रम घेतले.