नवीन जोशी कॉलनीतील घटनेने हळहळ
जळगाव (प्रतिनिधी) : – शहरातील नवीन जोशी कॉलनी परिसरात एका २५ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली. मोहीत किरण जोशी असे मृत तरुणाचे नाव असून, त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

मोहीत हा आपल्या कुटुंबासह नवीन जोशी कॉलनीत वास्तव्यास होता. त्याचे वडील एमआयडीसी परिसरात चटई फॅक्टरी चालवतात, मोहीत देखील या व्यवसायात वडिलांना मदत करत होता. गुरुवारी दुपारी त्याने आपला मोबाईल स्विच ऑफ केला आणि तो घराच्या दुसऱ्या मजल्यावर गेला. सायंकाळ झाली तरी तो खाली न आल्याने कुटुंबीयांना शंका आली. मोहीतची आई त्याला बोलावण्यासाठी वरच्या मजल्यावर गेली असता, खोलीचा दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ हाक मारूनही प्रतिसाद न मिळाल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडण्यात आला. यावेळी मोहीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
आपल्या पोटच्या गोळ्याला अशा अवस्थेत पाहताच आईने एकच हंबरडा फोडला. हा आक्रोश ऐकून संपूर्ण परिसर सुन्न झाला होता.नागरिकांनी मोहीतला तातडीने खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मोहीतच्या पश्चात आई, वडील, काका आणि भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सध्या ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.









