जळगाव ( प्रतिनिधी ) – छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव आणि महाविद्यालयातील रेड रिबन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 19 फेब्रुवारी 2026 रोजी भव्य रक्तदान शिबिर व एड्स जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवजयंतीदिनी रक्ताच्या रूपाने मानवतेची सेवा करण्याचा संकल्प महाविद्यालयाने केला आहे.

या शिबिराचा उद्देश केवळ रक्तदानापुरता मर्यादित नसून, तरुणांमध्ये एड्स (AIDS) या आजाराबाबत जागरूकता निर्माण करणे, त्याचे दुष्परिणाम व प्रतिबंधात्मक उपायांची माहिती देणे हा देखील आहे. तरुणाईला आरोग्याबाबत सजग करण्यासाठी रेड रिबन क्लबमार्फत हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे.
रक्तदान करणाऱ्या दात्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी तसेच पोषणविषयक सल्ला देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने आहार-विहाराचे महत्त्वही यावेळी समजावून सांगितले जाणार आहे.
या शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नागनाथ गंगासागरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, कार्यक्रमाचे नियोजन रेड रिबन क्लबचे समन्वयक तथा रचना शारीर विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. सचिन नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
या शिबिर 19 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अंतर रुग्ण कक्ष, शल्य तंत्र विभाग, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे होणार आहे. महाविद्यालय प्रशासनाने जास्तीत जास्त तरुण, विद्यार्थी व नागरिकांनी सहभागी होऊन “रक्तदान करा -जीवन वाचवा” या कार्यात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे.








