रास्ता रोको आंदोलनावेळी कोळी समाजाची आक्रमकता
जळगाव (प्रतिनिधी) :- एकीकडे मराठा आरक्षणासाठी मराठा बांधवाचे आंदोलन होत असताना दुसरीकडे कोळी बांधवही आपल्या न्यायहक्कासाठी लढत आहेत. गेल्या २३ दिवसांपासून कोळी समाजाच्या आरक्षणात सुलभता व सरळता यावी व ते लवकरात लवकर मिळावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आमरण उपोषण सुरू आहे. बुधवारी एक नोव्हेंबर रोजी सकाळी कोळी बांधवांकडून दहा वाजता बांभोरी पुलावर तर साडेअकरा वाजेला आकाशवाणी चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी एसटीवर लावण्यात आलेल्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिमेला काळे फासण्यात आले व सरकारचा निषेध करण्यात आला.
अशा विविध मागण्यांसाठी गेल्या २३ दिवसांपासून आदिवासी कोळी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे. या दरम्यान प्रकृती खालावलेले सहा जण रुग्णालयामध्ये उपचारही घेत आहे. दि. ३० रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी यांच्या समक्ष प्रांत अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. शासनाला उपोषण कालावधीमध्ये कोळी जमातीच्या किती बांधवांना जिल्ह्याच्या अनुसूचित जमातीचे दाखले दिले गेले हे सांगण्यात असमर्थन आढळून आले. त्यामुळे आज एक नोव्हेंबर रोजी कोळी समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. कोण म्हणते देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, या तीन तोंडी सरकारचा निषेध असो अशा घोषणांनी वातावरण दणाणून गेले होते.
यानंतर सकाळी बांभोरी पुलाजवळ रस्ता रोको करण्यात आला. तर साडेअकरा बारा वाजेच्या सुमारास आकाशवाणी चौकामध्ये रस्ता रोको करण्यात आला. यावेळी एसटी महामंडळाच्या बस वर लावण्यात आलेले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बॅनरला काळे फासण्यात आले व निषेध व्यक्त करण्यात आला.