भाजप-शिवसेना नगरसेवकांची उपस्थिती
जळगाव (प्रतिनिधी):- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या लोकप्रिय दृकश्राव्य कार्यक्रमाचे जळगाव शहरात विशेष आयोजन करण्यात आले होते. धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संस्था आणि जळगाव शहराचे आ. राजूमामा भोळे यांच्या पुढाकाराने रविवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


शहरातील सर्व नगरसेवकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री तथा खा. ना. रक्षाताई खडसे, आ.राजूमामा भोळे, महापौर दीपमाला काळे, भाजप गटनेता प्रकाश बालाणी, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, माजी खा. डॉ.उल्हास पाटील, माजी आ. शिरीष चौधरी, नशिराबादचे नगराध्यक्ष योगेश पाटील, फैजपूरचे नगराध्यक्ष दामिनी सराफ यांच्यासह कार्यक्रमाला राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे जळगाव महानगरपालिकेतील भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या सर्व नगरसेवकांनी एकत्र येत पंतप्रधानांचे संबोधन ऐकले. विकासकामे, आर्टिफिशियल इंटेलिजंटचे तंत्रज्ञान तसेच युवक कल्याण, क्रीडा क्षेत्राचा विकास आणि जनसंवादाच्या दृष्टीने ‘मन की बात’ मधील मुद्दे लोकप्रतिनिधींसाठी मार्गदर्शक ठरतात, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.









