जळगावात महामार्गावर शांती नगरात दुपारची घटना
जळगाव (प्रतिनिधी) – येथील राष्ट्रीय महामार्ग ६ ला लागून असलेल्या जलाराम नगर परिसरात असलेल्या शांती नगर परिसरात शनिवारी दि. २७ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. यात घरमालकाचे साधारण ३ लाख रुपयांपर्यंत नुकसान झाले आहे.

मंगलसिंग बडगुजर हे शांती नगर १ येथे राहतात. दुपारी त्यांच्या घरी त्यांच्या पत्नी व २ मुले घरी होते. तेव्हा अचानक शॉर्ट सर्किट होऊन घरात आग लागली. कुटुंबियांना समजताच त्यांनी बाहेर जाऊन शेजारी माहिती दिली. तोवर आग घरात पसरली. आगीत टीव्ही, फ्रिज, गादी, किचनमधील साहित्य आदी संसारोपयोगी साहित्य जाळून खाक झाले.
याबाबत महापालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. आगीच्या बंबाने आग विझविली. या आगीत नुकसान झाल्याने बडगुजर परिवाराला रडू कोसळले होते. दरम्यान, आगीत ३ लाखांपर्यंत नुकसान झाले असल्याचा अंदाज आहे.










