आयोगाच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची केली मागणी
जळगाव ( प्रतिनिधी ) – नाशिक येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी कॅप्टन अशोक खरात यांच्यावर कठोर कारवाई करावी तसेच या प्रकरणाशी नाव जोडले गेलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचा राजीनामा घेत त्यांना तत्काळ पदावरुन पायउतार करावे, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाने केली आहे. या मागणीसाठी ठाकरे गटाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले.

महाराष्ट्राची एप्स्टिन फाईल म्हणून सध्या नाशिकचं लैंगिक अत्याचार गाजत आहे. यात अशोक खरात यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप असून, त्याला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, या प्रकरणानंतर सोशल मीडियावर रूपाली चाकणकर यांचे खरात यांच्यासोबतचे फोटो व्हायरल झाले आहेत. यावरून शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतला असून, या गुन्ह्यात चाकणकर यांचाही सहभाग असल्याचा खळबळजनक आरोप करत चकणकरांच्या राजीनाम्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
यासाठी जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन देखील करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडी प्रमुख मनीषा पाटील आणि उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे यांनी केले. आंदोलनादरम्यान पदाधिकारी म्हणाले की, रूपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावर राहिल्या तर या प्रकरणाच्या तपासात त्यांचा हस्तक्षेप होऊ शकतो.
पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे या पदावरून पायउतार होणे गरजेचे आहे. जोपर्यंत त्यांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात मागण्यांचे निवेदनही देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.









