जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरात एटीएममध्ये मदत करण्याच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकांचे एटीएम कार्ड बदलून फसवणूक करणारी टोळी सक्रिय झाल्याची माहिती समोर आली आहे. पेन्शनर्स आणि वयोवृद्ध नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या या हातचलाखीच्या गुन्ह्यांमुळे पोलीस प्रशासनाने तत्काळ सतर्कतेचा इशारा देत महत्त्वपूर्ण सूचना जारी केल्या आहेत.


गेल्या काही दिवसांत एटीएमसमोर ‘मदतीच्या’ बहाण्याने अनोळखी व्यक्ती नागरिकांच्या जवळ जात असून, व्यवहारात अडचण भासल्याचा फायदा घेत कार्ड बदलले जात असल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी एटीएमवर कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून मदत न घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. पैसे काढताना समस्या आल्यास केवळ बँकेतील अधिकृत कर्मचारी किंवा सोबत असलेल्या नातेवाईकाचीच मदत घ्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
एटीएम पिन टाइप करताना कीपॅड हाताने झाकावा, कोणी पाहत नाही ना याची खात्री करावी, तसेच मशीनमध्ये कार्ड टाकण्यापूर्वी आणि व्यवहार पूर्ण झाल्यानंतर ते आपलेच कार्ड आहे की नाही याची तपासणी करावी, असेही पोलीस प्रशासनाने सांगितले. मदतीचा बहाणा करणाऱ्या व्यक्तीच्या हातात आपले कार्ड कधीच देऊ नये, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
फसवणूक झाल्याची शंका आल्यास नागरिकांनी विलंब न करता त्वरित १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधावा किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी. अशी घटना अधिक वाढू नये यासाठी नागरिकांनी सजग राहून ही माहिती आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींना आणि परिचितांना पोहोचवावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केले आहे.









