विधान परिषदेत प्रशासनाला धारेवर धरले
मुक्ताईनगर ( प्रतिनिधी ) – जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यातील ६ तालुक्यांमधील २६ गावांमध्ये पिण्याचे पाण्याचे स्त्रोत दूषित झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचा गंभीर मुद्दा आमदार एकनाथराव खडसे यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला. दूषित पाण्यामुळे टायफॉइड, कॉलरा आणि हिपॅटायटीस-ए सारख्या आजारांचा धोका वाढला असून, प्रशासकीय यंत्रणेने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप खडसे यांनी यावेळी केला.


आमदार खडसे यांनी सभागृहात माहिती देताना सांगितले की, आरोग्य विभागाने ५ डिसेंबर २०२५ रोजी केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली होती. तरीही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यास विलंब का झाला? नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असताना शासन नेमकी काय कारवाई करत आहे आणि संबंधित गावांमध्ये जलशुद्धीकरणासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
एकनाथराव खडसे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी माहिती दिली की, नोव्हेंबर २०२५ मध्ये जळगाव जिल्ह्यात एकूण २,३६६ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती.
यामध्ये ३४ नमुने दूषित आढळले होते, ज्यात ३१ नमुने ग्रामीण भागातील तर ३ शहरी भागातील होते. प्रकल्प संचालक (जजमि) यांच्या अहवालानुसार, या ३४ नमुन्यांची तातडीने पुनर्तपासणी करण्यात आली असून आता ते पाणी पिण्यायोग्य असल्याचे अहवालात म्हटले आहे.
ज्या स्त्रोतांचे पाणी दूषित आढळले होते, तिथे सलग तीन दिवस ‘मसुपरक्लोरिनेशन’ प्रक्रिया राबवून जलशुद्धीकरण करण्यात आले आहे. सध्या या गावांमध्ये मेट्रॉपिकल क्लोरिनेटेड लाईम (टी.सी.एल.) चा वापर करून दैनंदिन पाणी शुद्धीकरण केले जात आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार, सद्यस्थितीत जलजन्य आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ दिसून येत नसल्याचेही मंत्र्यांनी स्पष्ट केले. ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध आणि सुरक्षित पाणी मिळावे, यासाठी एकनाथराव खडसे यांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेचे जळगाव जिल्ह्यातून स्वागत होत आहे.









