जिल्हा परिषदेकडून देण्यात आली माहिती
जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत राबविण्यात आलेल्या विविध सुधारात्मक उपाययोजनांना मोठे यश मिळाले आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानकांनुसार (NQAS) घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय मूल्यांकनात जळगाव जिल्ह्यातील ८ आरोग्य उपकेंद्रांनी ७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून बाजी मारली आहे. या उपकेंद्रांना राज्यस्तरीय NQAS प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्याच्या दृष्टीने विशेष पाऊले उचलली होती. या मूल्यांकनासाठी आरोग्य सेवा गुणवत्ता, रुग्ण सुरक्षितता, स्वच्छता, संसर्ग नियंत्रण, औषध उपलब्धता, रुग्ण समाधान, इमारत व कार्यालयीन व्यवस्थापन अशा ८ विविध निकषांच्या आधारे तपासणी करण्यात आली होती. या सर्व निकषांवर जळगावच्या उपकेंद्रांनी गुणवत्तेचा ठसा उमटविला आहे.
मानांकन प्राप्त झालेली आरोग्य उपकेंद्र व टक्केवारी
तरसोद (नशिराबाद, ता. जळगाव): ९०%
शिरूड (जानवे, ता. अमळनेर): ९०%
लोनजे (रांजणगाव, ता. चाळीसगाव): ८९%
गोजरे (वडारशिंम, ता. भुसावळ): ८७%
शिवगे (शिरसोद, ता. पारोळा): ८५%
रणाईचे (जानवे, ता. अमळनेर): ८०%
चांगदेव (रुईखेडा, ता. मुक्ताईनगर): ८०%
राणीचे बांबरुड (नांद्रा, ता. पाचोरा): ७८%
ग्रामीण रुग्णसेवेला नवी दिशा
या मानांकनामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आता अधिक दर्जेदार, सुरक्षित आणि विश्वासार्ह आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. जिल्हा आरोग्य प्रशासनाचे प्रभावी मार्गदर्शन आणि वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, सेविका व कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमांमुळे हे यश संपादन करता आले असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी सांगितले.









